जो जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असतो तर त्याचे परिणाम काय असतात हे त्यांना ठावूक असतं. त्यामुळे आपण काय करायचं आणि काय करू नये ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. शेवटी कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतं, असं म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केलं. तसंच राणे, राणा आणि आता राज ठाकरे हे RRR विरोधकांनी जुळवलेलं दिसतंय असा टोला देखील छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.
"देशात एकतर महागाई वाढलीय. बेरोजगारी वाढलीय ते महत्वाचं असताना देशासाठी कोणता प्रश्न महत्वाचा आहे ते पाहायला हवं. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न कसे सोडवता येतील ते पाहणं महत्वाचं आहे. राणा दाम्पत्याला कोर्टानंही सुनावलं आहे. त्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुमच्या कामाची प्राथमिकता लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनं असायला हवी", असा सल्ला देखील भुजबळ यांनी यावेळी देऊ केला.
RRR चित्रपटाचा उल्लेख करत भुजबळांचा टोलादाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट RRR ची उपमा छगन भुजबळ यांनी राणे, राणा आणि राज यांना दिली. राणे, राणा आणि आता हे राज...RRR हे विरोधकांनी महाविकास आघाडीविरोधात जुळवून आणलेलं दिसतंय, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. तसंच आंदोलन करण्यावर ठाम असाल तर पोलीस देखील त्यांचं काम करतील. पोलिसांनी नियमाप्रमाणे नोटीस दिल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणं हे पोलिसांचं काम आहे, असंही भुजबळ म्हणाले.