मुंबई - खासदार नारायण राणे भाजपात तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला असून, आपणही लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे राणेंचं भाजपात जाण्याचे ठरलं पण भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाचा काय ? अशी चर्चा आता पाहायला मिळत आहे.
बऱ्याच दिवसांपासून नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. राणेंच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेकडून विरोध होत असल्याने राणेंचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला. मात्र त्यांनतर भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या. त्यामुळे 'राणे तुमचे तर, भुजबळ आमचे' अशी चर्चा सुद्धा शिवसेनेत सुरु असल्याचे दिसून आले.
मात्र आता राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राणे भाजपात गेले तर भुजबळांच्या सेना प्रवेशाचा काय अशी चर्चा सुद्धा पाहायला मिळत आहे. तर आता शिवसेना आणि भुजबळ हे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काही दिवसांपूर्वीचं पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहिले असल्याने त्यांच्या सेना प्रवेशाला पूर्णविराम मिळाला होता. मात्र आता राणेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यानंतर भुजबळांच्या सेने प्रवेशाची चर्चा रंगत आहे.