मुंबई - एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट आणि भाजपा हे एकत्र आले आहेत. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या कुटुंबीयांमधील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. काल नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे आणि केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर रात्री निलेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट करत दीपक केसरकर यांना डिवचले आहे.
उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल तर दीपक केसरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यामुळे पुढच्या काळाता राणे कुटुंबीय आणि दीपक केसरकर यांच्यातील मतभेद टोकाला जाण्याची शक्यता आहे.
काल दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, असा इशारा दिला होता. त्यानंतर राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. दीपक केसरकर कुठेतरी म्हणालेत की, राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण आघाडीमध्ये आहोत. हे विसरू नका. ही आघाडी टीकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच ती ती तुमच्यावर आहे. तुम्हाला राजकीय जीवनदान मिळालंय हे विसरू नका. मान मिळतोय तो घ्यायला शिका, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही नव्यानेच मीडियासमोर बोलायला लागला आहात. कोणाला काय बोलायचं हे विचारून घ्या, असा इशारा निलेश राणे यांनी दिला होता.
त्यानंतर निलेश राणे यांना दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिले होते. निलेश राणेंची काय लायकी आहे, हे आठ वर्षांपूर्वी कोकणातील जनतेने दाखवून दिले आहे. ते विसरले असतील तर जनता पुन्हा एकदा त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल, असा टोला केसरकर यांनी लगावला होता.