कुडाळ : डम्पर चालक-मालक आंदोलनाची पुढील भूमिका सोमवारी जाहीर करणार असून, लाठीमार ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने झाला त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती काँग्रेसनेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गौण खनिज व्यावसायिक व डम्परचालक-मालक संघटना व्यावसायिक यांचा मेळावा घेतला व या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनाच्या कार्यप्रणालीवर व सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर टीका केली. गौण खनिज व्यावसायिक वाहतूकदार यांच्याकडे पोलीस किंवा महसूल विभागातील कोणाही कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केल्यास त्याची माहिती मला फोनवरून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.शनिवारी आंदोलकांनी दगड घेऊन काचा फोडल्या नाहीत तर, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संगनमताने लाठीमार केला व या पोलिसांच्या लाठीमारामध्ये मोठ्या प्रमाणात काचा फोडण्यात आल्या, असेही राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट डम्पर आंदोलकांवर झालेल्या लाठीमारच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डम्परधारक आणि गौण खनिज व्यावसायिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या जाचक अटींविरोधात न्याय मागण्यासाठी रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. चौकशी समिती स्थापन जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड आणि त्यानंतर झालेला लाठीमार या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कोकण आयुक्त तानाजी सत्रे यांची एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.
लाठीमाराच्या विरोधात राणे जाणार न्यायालयात
By admin | Published: March 07, 2016 3:49 AM