मुंबई : काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींकडे शब्द टाकल्यामुळे केतकर यांना उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.केतकर अर्ज भरण्याअगोदर माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे बसले होते. तेथे राणे त्यांना भेटायला आले. समोर सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पाहून काही क्षण राणे थबकले, नंतर त्यांनी केतकरांचे अभिनंदन केले. तर काँग्रेसच्या नेत्यांनी राणेंचे अभिनंदन केले. पण शुभेच्छा घेताना राणेंच्या चेहºयावर हास्य नव्हतेच. राणेंना शोधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वळसेंच्या दालनात आले. त्यांना पाहून काँग्रेसच्या काही अतिउत्साही नेत्यांनी तुम्ही तीन अर्ज दाखल करणार की चार, असा सवाल केला. त्यावर ‘तुम्ही म्हणाल तसे करू!’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.>पर्याय नव्हतारविवार सायंकाळपर्यंत राणे अर्ज दाखल करण्यास तयार नव्हते; पण केंद्रातील एका बड्या नेत्याने मध्यस्थी करून राणे यांचे मन वळवल्याचे समजते. राणेंना राज्यातच मंत्रिपद हवे होते. त्यासाठी ते अडून होते. मात्र, भाजपाने त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यापुढे पर्याय नव्हता.
राणेंनी ‘स्वाभिमान’ सोडला!, राज्यसभा निवडणुकीसाठी भरला अर्ज
By अतुल कुलकर्णी | Published: March 13, 2018 5:47 AM