औरंगाबाद, दि. १ : जो चेंबूरच्या चित्रपटगृहाबाहेर तिकिटे विक्री करत होता. त्याला बाळासाहेबांच्या आर्शिवादामुळे सर्व पदे उपभोगायला मिळाली. या पदांच्या सहाय्याने भ्रष्टाचारातून अमाप माया जमवणा-या नारायण राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टिका शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.
राज्यात वाढलेली महागाई आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आला आहे. याविरोधात शिवसेना महिला आघाडीतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौकात निदर्शनांचे आयोजन केले आहे. या संदर्भात महिला आघाडीसह शिवसेना नगरसेवकांची सुभेदारी विश्रामगृहात बैठक झाली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांनी शिवसेनेला टार्गेट करणारे नारायण राणे यांच्यावर खरमरीत टिका केली.
ते म्हणाले, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या म्हणण्यानुसार कोंबडीचोर असणारांना चपराशाचे मुख्यमंत्री केले. सर्व पदे दिली. तरीही शिवसेनशी गद्दारी केली. पुढे काँग्रेसमध्ये गेल्यावरही तेथील वरिष्ठ नेत्यांवर टिका केली. राणे हे हस्तक आहेत. त्यांनी आताही भाजपामध्ये जाण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र भाजपवाल्यांनी का घेतले नाही? पैशाच्या जिवावर सर्व काही करता येते या भ्रमात राणे यांनी राहू नये, दोन वेळा शिवसेनेने पराभूत केल्याची आठवण ठेवावी.तसेच भाजपाने त्यांना पक्ष प्रवेश न दिल्यामुळे ते सूद्धा अभिनंदनास पात्र आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
महागाई, जिएसटी विरोधात सोमवारी निदर्शनेशिवसेना महिला आघाडीतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता महागाई, जीएसटी विरोधात क्रांतीचौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरांमध्ये महागाई विरोधात आंदोलने करण्यात आली. आता औरंगाबादेत करण्यात येणार असल्याचे खा. खैरे यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, भाविसेचे निमंत्रक राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख नंदु घोडेले, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, सिद्धांत सिरसाठ, सचिन खैरे यांच्यासह महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, रंजना कुलकर्णी, सुनिता देव, आशा दातार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.