मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांना भाजपाकडून मंत्रीपद दिलं जाणार असल्याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे. भाजपाकडून मला राज्यसभेची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट आज नारायण राणे यांनी केला आहे. काल नारायण राणे नवी दिल्लीला गेले होते. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना भेटल्यानंतर राणे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला मंत्रीपद देण्यावर ठाम आहेत. पण मंत्रीपदाला आणखी उशीर होईल असे ते म्हणाले आहेत. तो पर्यंत मला राज्यसभेत जायचे असल्यास भाजपानं तयारी दर्शवली असल्याचे राणें म्हणाले.
पुढच्या महिन्यात राज्यसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यातील तीन जागा भाजप सहज जिंकू शकणार आहे. त्या दृष्टीनं राणेंना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत पाठवण्याचा विचार भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. अमित शहांसोबत झालेल्या भेटीदरम्यान याबाबत खलबतं झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नारायण राणे यांनी आमदारकी सोडत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी भाजपच्या सल्ल्याने महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि आपल्या पक्षाचा एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला. याबदल्यात त्यांना मंत्रिपद दिले जाईल असे आश्वासन भाजपाने दिल्याचे बोलले गेले. पण अद्यापही भाजपाने राणेंना ताटकळत ठेवलं आहे.
भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी काल अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवी दिल्लीत उपस्थिती लावली आहे. विशेष म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेसुद्धा दिल्लीत दाखल झाले होते. या दिल्ली भेटीदरम्यान नारायण राणेंनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
काल रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रात्री उशीरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाली. दिल्लीतील 11 अकबर रोड येथे जवळपास एक तासाहून जास्त वेळ ही बैठक सुरू होती. दरम्यान, राणे यांचा राज्यात मंत्रीमंडळ प्रवेश करायचा की त्यांना राज्यसभेवर दिल्लीत पाठवायचं यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी नितेश राणे हे देखील उपस्थित होते अशी माहिती आहे. विशेष म्हणजे शहांच्या भेटीनंतर नारायण राणे, फडणवीस, शेलार हे तिघंही एकाच गाडीतून जाताना दिसले. यावेळी राणेंनी पत्रकारांकडे पाहून एक गोड स्माईल दिली. त्यामुळे राणेंची इच्छापूर्ती झाल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली.