सावंतवाडी : राज्याच्या राजकारणातील सर्व महत्त्वाची पदे भूषविली असली, तरी मला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. ती कधीही दडवून ठेवली नाही, असे सांगत माणसाने महत्त्वाकांक्षी असलेच पाहिजे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सावंतवाडी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात ते मंगळवारी बोलत होते.राणे म्हणाले, मी गेली ३१ वर्षे राजकारणात आहे. नगरसेवकापासून ते मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अधिकाऱ्यांशी माझे जवळचे संबंध आहेत आणि ते मी कायम टिकवून ठेवले आहेत. प्रत्येक अधिकारी हा मेहनतीने पुढे जात असतो. यूपीएसीमध्ये महाराष्ट्राचा टक्का फारच कमी आहे. पण बिहार, केरळ, तामिळनाडू या राज्यातून मोठ्या प्रमाणात आयएएस व आयपीएस होऊन अधिकारी म्हणून येतात. असे विद्यार्थी सिंधुदुर्गमधून देशात कधी पाहायला मिळणार, असा सवाल त्यांनी केला.सध्या काँग्रेसमध्ये असलेले राणे शिवसेनेत असताना १९९५-९६ मध्ये सत्तेवर आलेल्या पहिल्या युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. केवळ सहा महिने त्यांना हे पद भूषविता आले. कारण, त्यानंतर लगेच झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचा पराभव होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. यथावकाश, राणे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकून काँग्रेसमध्ये आले. तेव्हापासून राणे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. (प्रतिनिधी)
राणेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय!
By admin | Published: January 04, 2017 12:21 AM