ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - एमआयएम ही पार्टी शिवसेनेचेच पिल्लू आहे, या नितेश राणेंच्या टीकेला शिवसेनेने चोख प्रत्युत्तर देतानाच एमआयएमला मॅनेज करण्यासाठी राणेंनीच पाच कोटींची ऑफर दिल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. एमआयएमसोबत त्यांचे सेटिंग बिघडल्यामुळेच ते असे आरोप करत आहेत, राणेंच्या मुलांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
वांद्रे पूर्व येथीलपोटनिवडणुकीत शिवसेना व एमआयएमचं सेटिंग झालं होतं, निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी एमआयएमचे आमदार रामदास कदम यांच्या कॅबिनमध्ये बसल्याचे अनेकांनी पाहिलं होतं, असा आरोप नितेश राणे यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना रामदास कदम यांनी राणेंवरच पलटवार करत राणेंनीच एमआयएमच्या आमदारांना पाच -पाच कोटींची ऑफर दिल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. तसेच राणेंच्या मुलांना आम्ही किंमत देत नाही, असेही ते म्हणाले.