राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:19 PM2019-01-21T22:19:16+5:302019-01-21T22:19:44+5:30
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कोणतेही विधान केले नाही. फक्त अफवा पसरवण्याची कामे सुरू आहे. असा खुलासा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
सावंतवाडी : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कोणतेही विधान केले नाही. फक्त अफवा पसरवण्याची कामे सुरू आहे. असा खुलासा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेची जागा काँग्रेसचीच असून, आम्ही आमचा उमेदवारच उभा करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, मनसे यांना आघाडीमध्ये घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसच्या कोकण जनसंपर्क यात्रेचा शेवटचा टप्पा सावंतवाडीतून सुरू झाला असून, त्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे सोमवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, काँग्रेस कोकण प्रभारी बी. संदीप, भाई जगताप, माजी आमदार सुभाष चव्हाण, राजन भोसले, विजय सावंत, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, माजी आमदार पुष्पसेन सावंत, दिलीप नार्वेकर, आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. काही जागा या मित्रपक्षांना द्यायच्या आहेत. त्यामुळे या आठवडाभरात अंतिम निर्णय घेतला जाईल. आघाडीत महाराष्ट्र स्वाभिमान तसेच मनसे या दोन पक्षांना घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रस्ताव आम्हाला दिला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी ही लोकसभेची जागा काँग्रेसची असून, आम्ही आमचाच उमेदवार येथे उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जर भाजप सरकार विरोधात उपोषणाचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे स्वागतच आहे.
आम्ही नेहमी चांगल्या गोष्टींसाठी पाठिंबा देत असतो. त्यामुळे जनतेच्या हिताच्या गोष्टी असतील तर आमचा हजारेंना पाठिंबाच राहील, असे यावेळी त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये समाधानी नाहीत. त्यामुळे काँग्रेसमध्ये येतील, असे विधान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी असे कोणतेच विधान थोरात यांनी केले नाही. माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि एखाद्या व्यक्तीला काँग्रेसमध्ये यायचे असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे प्रस्ताव येईल. पण असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. भाजप सरकारच्या निवडणूक घोषणा सुरू आहेत. पण जनता यात फसणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तरी चालतील, काँग्रेस निवडणुकीला केव्हाही सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी चव्हाण यांनी स्पष्ट केले.