सिंधुदुर्ग : चिपी येथे शनिवारी झालेला विमानतळ उद्घाटन सोहळा गाजला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेले शाब्दिक प्रहार आणि राणे यांना करावा लागलेला सामना यामुळे. चार वर्षांनंतर दोघेही दिग्गज एकत्र आल्याने ते काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष होते.सुुरुवातीला राणे यांचे भाषण झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जिल्ह्याचा विकास माझ्यामुळेच झाला असा दावा करीत राणे यांनी विकासकामांत शिवसेनेचेच लोक आडकाठी आणतात, जरा तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी, आजचा दिवस हा आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असे सुनविले.
ज्योतिरादित्य सिंदिया यांची ऑनलाइन उपस्थितीनागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजनेअंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती लावली होती. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नारायण राणे उवाच
- सी वर्ल्डसाठी अजित पवारांनी १०० कोटी रुपये दिले. काय झालं हो. कोणी सी वर्ल्ड रद्द केलं. भांडं काय फोडायचं, किती फोडायचं, तुम्ही समजता तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय.- स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? प्रोटोकाॅल काय? मानसन्मान घ्या. प्रोटोकॉल जरूर पाळा. तुम्हाला याची सर्व माहिती मिळते, ब्रीफ होतेय. पण, ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात. - बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांचा थारा नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं, यायचं...हे चांगलं नाही. चांगल्यामनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू.- आदित्य ठाकरे या कार्यक्रमासाठी माझ्या जिल्ह्यात आले. माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहे. मी त्याला काहीच बोलत नाही आणि बोलणार नाही. त्याला शुभेच्छा देईन. सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी कर्तबगार मंत्री म्हणून काम करून दाखवावे. मला त्याचा आनंद आहे.
मुख्यमंत्र्यांचे फटके-कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडे उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो.त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. -काही लोक पाठांतर करून बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखविणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं.-आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट लावावं लागतं, तशीच काही लोक आज या ठिकाणी आहेत.-नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. अशा खोटं बोलणाऱ्यांना त्यांनी गेट आऊट केलं.-मी एरियल फोटोग्राफी करत होतो, महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे … माझा समज असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणीतरी बोलेल, तो मीच बांधलाय.-मी विकासाच्या कामात पक्षभेद आणत नाही. नारायण राणे यांना आठवत नसेल, पण तुमच्या महाविद्यालयाच्या वेळी तुम्ही मातोश्रीवर फोन केला होता तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी फाईलवर सही केली होती. कारण, हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या, जनतेच्या भल्यासाठी होते.-तुमच्याकडे सूक्ष्म आणि लघु खाते असले तरी मोठे खाते आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा. -आपण काही चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. कोकणची जनता शांत, संयमी आहे म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल, असं नाही. ती मर्द आहे. - विनायक राऊत इथे निवडून आलेले खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे.