- हरी मोकाशेलातूर : समाजापासून दुरावलेले आणि अधांतरी जीवन जगणाऱ्या जन्मत: एचआयव्ही संक्रमित असलेल्या युवकांना विवाह म्हणजे स्वप्नवतच असतो. परंतु, हासेगावच्या हॅप्पी इंडियन व्हिलेजमध्ये तो क्षण प्रत्यक्षात येत असून, चार वधू-वरांच्या हातावर मेंदी रंगली आहे. शनिवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत.प्रा. रवी बापटले यांनी २००७ मध्ये हासेगाव येथे समाजातील दानशुरांच्या मदतीने एचआयव्ही संक्रमित बालकांसाठी सेवालय सुरू केले. त्यानंतर एचआयव्ही संक्रमित १८ वर्षांपुढील युवकांसाठी २०१५ मध्ये हॅप्पी इंडियन व्हिलेज निर्माण केले. त्यासाठी सेवालयातील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गणेशमूर्ती विक्रीतून निधी उभारला. सेवालयात ५० मुले तर हॅप्पी इंडियन व्हिलेजमध्ये ३५ युवक आहेत.उपवर झालेल्या चौघा वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा रविवारी होत आहे. पूजा-महेश, सोनी-अक्षय, अश्विनी-राजबा, नेहा-राजकुमार यांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत.