पवन देशपांडे,
मुंबई- भारत-पाक सीमारेषा सील करण्याची किंवा या ठिकाणी अत्याधुनिक उपाय योजण्याची घोषणा पहिली नाही. यापूर्वीही अनेक वेळा अशा घोषणा झाल्या आहेत. पाकिस्तानकडून ज्या-ज्या वेळी घातक हल्ले झाले त्या-त्या वेळी भारताने सीमेवर कडक उपाय योजण्याचे जाहीर केले होते. यापूर्वीच्या काही योजना.>जानेवारी 2016 : पठाणकोट हल्ल्यानंतर जम्म-काश्मीरपासून ते गुजरातपर्यंतच्या सीमेवर इस्रायलसारखे तंत्रज्ञान वापरून सीमा सुरक्षा करण्याचा विचार पुढे आला होता. इस्रायलने आपल्या सीमेवर अनेक हाय रिझोल्युशन असलेले कॅमेरे लावले आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी हालचाल टिपू शकणारे आणि तसा अॅलर्ट देऊ शकणारे तंत्रज्ञान तथा थर्मल इमेजर बसविले आहेत. हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारीही डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दर्शविली होती. इजिप्तने आपल्या सीमा सात मीटर उंच धारदार फेन्सिंगनेही सुरक्षित ठेवल्या आहेत. या फेन्सिंगमधून किंवा त्याच्या जवळून कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर लगेच सुरक्षारक्षकांना त्याचा अॅलर्ट मिळतो आणि प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणाहून घुसखोरीचा प्रयत्न होतोय ते ठिकाणही मिळते. याशिवाय इस्रायला सीमेवर छोट्या हवाई उपकरणांचाही वापर करते आणि जागोजागच्या हालचाली टिपते.>एप्रिल 2016 : सीमेवर लेझर वॉल तयार करण्याच्या योजनेला गुजरातमध्ये काहीसे मूर्त रूप मिळाले. ज्या ठिकाणांमधून सर्वाधिक घुसखोरी होते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लेझर वॉल तयार करण्याची घोषणा सरकारने केली होती. या लेझर वॉलमधून कोणी गेल्यास लगेच सुरक्षा दलाला अॅलर्ट मिळतो. अशा प्रकारच्या ४५ लेझर वॉल तयार करण्याची सरकारची योजना आहे. >जून 2016 : या महिन्यात भारताने सीमेवर रडार, लेझर तंत्रज्ञान, सीसीटीव्ही आणि अशा अनेक तंत्रज्ञानाद्वारे घुसखोरी ५० टक्के रोखायची अशी सरकारची योजना होती. सुरुवातीला गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा अशा राज्यांना लागून असलेल्या परकीय सीमांवर हे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जाहीर केले होते.