ऑनलाइन लोकमतकाटेवाडी, दि. 25 - कविवर्य मोरोपंताच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 25) काटेवाडीत दाखल झाला. काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडले. या वेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळाने मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे. दुपारी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या टाकून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दुपारी तीन वाजता तात्यासाहेब मासाळ, हरिभाऊ महारनवर, संभाजी काळे, निवृती पाटोळे यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. या वेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्ट्येपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फी गर्दी केली होती.बारामती शहरातून रविवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर मोतीबाग, पिंपळी, लिमिटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडीत पालखी सोहळा विसावला. या वेळी पालखी दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परिट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. ग्रामस्थांनी पालखीला खांदा दिला. या वेळी छत्रपती हायस्कूलच्या बँडपथकाने सुंदर लेझीम नृत्य केले. त्यानंतर वारकरी भाविकांनी गावामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या पालखी सोहळ्याचे बारामती टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सरपंच गौरी काटे, उपसरपंच जयश्री सुतार, वारकरी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एकनाथ काटे छत्रपतीचे संचालक प्रशांत काटे, पणन मंत्रालयाचे आधिकारी सुभाष घुले, श्रीजीत पवार यांनी स्वागत केले. काटेवाडी येथेल पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पताका, स्वागत कमानी, आकर्षक फुलांच्या माळानी सजावट केली होती. तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे पोलीस अधीक्षक बापू बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी तालुक्याच्या वतीने निरोप दिला. काटेवाडीच्या रिंगण सोहळ्यानतंर इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला.काटेवाडीच्या अंगणीमेंढ्या धावल्या रिगणीपायघड्या धोतराच्या, झाला गजर हरिनामाचा !
तुकोबांच्या रथाला वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण
By admin | Published: June 25, 2017 6:15 PM