ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 - स्वत:ला समाजसेवक संबोधणारे विक्रांत काटे यांच्याशी संबंधित फौजदारी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील यांची कन्या काश्मिरा पाटील व राज्य शासनाला नोटीस बजावून १३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.काटे यांनी, वडील डॉ. रणजित पाटील व संपूर्ण कुटुंबावर अवमानाजनक आरोप केल्याचा दावा करून काश्मिरा यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. काटे यांच्यावर कारवाई करण्याची विनंती तक्रारीत करण्यात आली आहे. जेएमएफसी न्यायालयाने या तक्रारीची दखल घेऊन सुरुवातीला याप्रकरणाची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत चौकशी करण्याचे निर्देश अकोला पोलिसांना दिलेत तर, ५ मे २०१५ रोजी काटे यांना समन्स बजावला. या आदेशाविरुद्धध काटे यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज सादर केला होता. हा अर्ज २१ जुलै २०१६ रोजी रद्द करण्यात आला. यामुळे काटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जेएमएफसी न्यायालयातील प्रकरण रद्द करण्याची त्यांची विनंती आहे. काटे यांनी २०१४ मध्ये पत्रकार परिषद घेऊन डॉ. पाटील यांच्याविरुद्ध मानहानीजनक आरोप केले. निवडणूक लढविण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात डॉ. पाटील यांनी त्यांची कन्या जयची माहिती लपवून ठेवली. प्रतिज्ञापत्रात केवळ काश्मिरा व शर्व या दोनच अपत्यांची माहिती दिली. त्यांच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा अल्पवयीन कन्या जयच्या नावावर आहे असा दावा काटे यांनी केला होता. जेएमएफसी न्यायालयात प्रलंबित तक्रारीमध्ये काटे यांचे सर्व आरोप खोडून काढण्यात आले आहेत. जय हे काश्मिरा यांचेच मूळ नाव आहे. गुमशी (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) येथील मालमत्तेवरून काटे यांचा काश्मिरा यांच्या आजोबासोबत वाद आहे. यामुळे काटे यांनी वाईट हेतूने काश्मिरा यांचे वडील डॉ. पाटील व संपूर्ण कुटुंबाचा अवमान करणारे आरोप केलेत असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रणजित पाटील यांच्या कन्येला नोटीस
By admin | Published: October 10, 2016 8:38 PM