मुंबई: ग्लोबल टीचर म्हणून ख्याती असलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींवरील (Ranjitsinh Disale) कारवाईसंदर्भात राजकीय स्तरावरून हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. डिसले गुरुजींनी (Disale Guruji) नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिक्षकाबाबत चुकीचे काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. यानंतर शिक्षण विभाग जागा झाला असून, जागतिक पुरस्कार विजेत्या डिसले गुरुजींबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईला वैतागून राजीनामा दिलेल्या डिसले गुरुजींचा राजीनामा परत घेण्याबाबत कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र डिसले गुरुजींनी राजीनामा परत घेण्याऐवजी आता जिल्हा प्रशासन हा राजीनामा नामंजूर करणार येणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांकडून जिल्हा मुख्याधिकाऱ्यांना लेखी सूचना आल्याचेही समजते.
शिक्षणाधिकाऱ्यांना इथून पुढे बाहेर न बोलण्याच्या लेखी सूचना
मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना इथून पुढे बाहेर न बोलण्याच्या लेखी सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तत्पूर्वी, गेल्याच आठवड्यातच डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर सर्व वस्तुस्थिती मांडली, त्यांच्यासमोर सर्व कागदपत्रे ठेवली. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर ८ ऑगस्टला भूमिका मांडणार आहे, असे डिसले गुरुजी यांनी सांगितले होते.
नेमकं प्रकरण काय?
जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा दिला आहे. ६ जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे २०१७ ते २०२० या काळात गैरहजर असल्याची प्रशासनाची माहिती खोटी निघाल्यानंतर त्यांच्यावर केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचे समोर आले होते.