सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. त्यात महायुतीमध्ये भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी घोषित केली आहे. या यादीत माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपातील मोठा गट नाराज झाला आहे. पुढील २-३ दिवसात माढ्यात राजकीय धमाका होण्याचीही शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली पण या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मोहिते-पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणे पसंत केले. अद्याप मोहिते पाटील घराण्यानं त्यांची भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर 'लावा ताकद.. आता माढा लोकसभा आपलीच' अशी मोहीम सुरू केली आहे. माढा मतदारसंघात भाजपाकडून खासदार रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील यांची नावे चर्चेत होती. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील यांनी विरोध केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यातील वाद मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर दोघांमधील वाद शमतील असे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटले होते. खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते- पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
पवारांच्या भेटीला कोण जाणार होते
माढ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे अनेकांचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. माढा मतदारसंघातील एक नाराज नेता गुरुवारी शरद पवार यांची भेट घेणार होता. पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील नीलेश लंके यांनी गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमामुळे या नेत्याची पवारांसोबत भेट झाली नाही. मात्र ही भेट शुक्रवारी म्हणजे आज होऊ शकते, असेही या सूत्रांनी सांगितले.
शरद पवार-विजयसिंह मोहिते पाटलांचे एकत्र फोटो
मोहिते-पाटील समर्थकांनी भाजपाविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे फोटो वापरत आहेत. शरद पवार गटाच्या चिन्हाचाही यामध्ये समावेश आहे. भाजपाने गेल्या पाच वर्षांत कशी मानहानी केली. विचारांपासून दूर गेल्यामुळे काय होते याचे दाखले दिले जात आहेत. या मोहिमेच्या पोस्ट आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अतिशय निकटवर्तीय मंडळींकडून शेअर केल्या जात आहेत
भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोडनि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. पार्लमेंटरी बोडनि एकदा निर्णय घेतला की भाजपचे कार्यकर्ते कामाला लागतात. माढ्यातून धैर्यशील मोहिते- पाटील इच्छूक होते हे खरे आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होणे सहाजिक आहे. या नाराजीला वेगळ्या पध्दतीने घेण्याची गरज नाही. मोहिते-पाटील भाजपच्या विरोधात भूमिका घेतील असे वाटत नाही. चेतनसिंह केदार, जिल्हाध्यक्ष, भाजप, माढा लोकसभा विभाग.