मुंबई : राज्यातील १७ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आज विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ झाला. विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड पळविण्यात आला. गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल आठवेळा तर विधान परिषदेचे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले आणि नंतर ते अक्षरश: गुंडाळण्यात आले.विधानसभेत शिवसेनेचे विजय औटी यांनी मेस्माचा मुद्दा उपस्थित केला. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सरकार अंगणवाडी सेविकांची मुस्कटदाबी करीत असल्याचा आरोप केला. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या निवेदनावर समाधान न झाल्याने शिवसेनेसह विरोधकांनी गदारोळ केला. त्यात विधानसभेचे कामकाज तब्बल आठवेळा तहकूब करण्यात आले.शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी आघाडी सरकारवरही हल्ला चढविला. अंगणवाडी सेविकांच्या आजचे प्रश्न हे तुमच्या पूर्वीच्या सरकारचे पाप आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनीही प्रभूंना पाठिंबा दिला. त्यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि प्रभू यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.- शिवसेनेचे उमरगा (जि.लातूर) येथील आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अध्यक्षांसमोरील राजदंड पळविला. मात्र अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी निलंबनाचा इशारा देताच चौगले यांनी राजदंड परत जागेवर आणून ठेवला.- शिवसेनेच्या सदस्यांनी एक मोठा फलक फडकविला. त्यावर, ‘अहो पंकजाताई का लावताय मेस्मा? आमचे कष्ट बघण्यासाठी लावा डोळ्यावर चष्मा’ असे लिहिलेले होते.
पंकजा मुंडे मेस्मावर ठाममेस्मा लावण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १२५ बालके दगावल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. शेवटी आमच्यासाठी या बालकांचे जीव महत्त्वाचे आहेत. आज तुम्ही मेस्माविरुद्ध बोलत आहात पण माझ्या मुलांच्या मृत्यूची जबाबदारी घेणार आहात का, असा सवाल त्यांनी केला.