मुंबई - भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सध्या पनवेलमध्ये सुरू आहे. दरम्यान, या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे भाजपासोबत सरकार स्थापन करणारा शिंदे गटही नाराज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चंद्रकांतदादांच्या या विधानाची गंभीर दखल घेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशांमुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. मात्र आपण हे दु:ख पचवून पुढे गेलो, कारण आपल्याला पुढे जायचं होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच सर्वच स्तरामधून टीका झाल्यानंतर भाजपच्या दिल्लीतीत पक्षश्रेष्ठींनीही त्याची गंभीर दखल घेतली असून, या भाषणाचा व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.