कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांची गुप्त बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतल्याने चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.काँग्रेसमध्ये नाराज असलेले राणे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मागील आठवड्यात त्यांनी अहमदाबाद येथे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आले होते. राणे यांनी त्याचे खंडण केले असले तरी मुख्यमंत्र्यांसमवेतचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. राणे यांच्या भाजप प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. ते भाजपमध्ये आल्यास भाजपमध्ये पुन्हा दोन गट पडतील व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील महत्त्वाची पदे मिळतील, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांंना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. बैठकीचा तपशिल बाहेर आला नसला तरी त्यांनी पक्षांतराबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असल्याचे समजते. २५ एप्रिलला राणे आपला निर्णय जाहीर करतील, अशी चर्चा आहे. (वार्ताहर)
राणेंनी घेतला कार्यकर्त्यांचा कानोसा
By admin | Published: April 24, 2017 3:00 AM