लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आकोली : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या नावाने खंडणी मागण्याचा कट वर्ध्यात शिजल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मंत्री कदम यांच्या कार्यालयातील टंकलेखक महेश सावंत याच्यानंतर मनोज मानवटकर (रा. पुलई) यास रविवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदूर (रेल्वे) येथील रेती कंत्राटदार गजानन खंडार यांनी भिकुजी महाराज संस्थान परिसरातील रेतीघाट लिलावात खरेदी केला होता. रेतीघाट घेतल्यानंतर खंडारला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून महेश सावंत फोन करून दोन महिन्यांपासून दहा लाखांची खंडणी मागत होता. या प्रकरणी खंडार याच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी हिसका दाखविताच त्याने प्रकरणाची कबुली दिली. या सर्व प्रकरणात त्याला वर्धा जिल्ह्यातील पुलई येथील मनोज मानवटकर याचे सहकार्य लाभल्याचे समोर आले. ही माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी वर्धा पोलिसांशी संपर्क साधत या प्रकरणातील महेश सावंत याचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणारा मास्टरमाइंड मनोज मानवटकर याला सदर ठेकेदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना अटक केली.
वर्ध्यात रचला गेला खंडणीचा कट
By admin | Published: May 15, 2017 6:25 AM