लोकमत न्यूज नेटवर्कअवसरी : राज्यात शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संप काळात आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक व अवसरी खुर्द येथे काही समाजकंटकांनी मंचर-शिरूर रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाणारे तरकारी मालाचे ट्रक, कांद्याचे टेम्पो, कोंबड्या वाहून नेणारी पिकअप गाड्या अडवून वाहनचालकाकडून खंडणी गोळा करण्याचा प्रकार झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. एखाद्या वाहनचालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने ट्रक आणि टेम्पोमधील माल फेकून देण्याचे प्रकार घडले आहेत. मंचर पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवसरी येथे ट्रकमधील कांद्याच्या पिशव्या, भुईमूग शेंगाची पोती, कोंबड्या काढुन नेल्याने ट्रक मालकांचे हजारोंचे नुकसान केले आहे. मंचर पोलिसांनी वाहनचालकांकडून खंडणी वसुल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी ट्रक टेम्पो मालक व पोल्ट्री मालक करत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात शेतकरी संघटनेने सहा दिवस शेतकरी संपावर गेले होते. याचा गैरफायदा घेऊन मंचर-शिरूर रस्त्यावर वरील सहा दिवसांत अवसरी येथे काही शेतकऱ्यांनी दुधाचे टॅँकर अडवून २५ हजार लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले. तर काही समाजकंटकांनी रात्री ८ ते १० वेळेत कोंबड्यांच्या पिकअप, तरकारी मालांचे ट्रक, कांद्याचे ट्रक, फ्लॉवरचे ट्रक अडवुन खंडणी वसूल केली आहे. जे वाहनचालक खंडणी देत नव्हते अशा वाहनचालकांच्या गाडीतील कांद्याच्या पिशव्या, भुईमूगाच्या शेंगाची पोती अवसरी खुर्द वायाळमळा येथे वाहून नेली. तर अवसरी बुद्रुक हिंगेवस्ती येथे कोंबड्या वाहतूक करणारा पिकअप अडवून पिकअप गाडीतील कोंबड्या काढून मटण, दारूपार्टी केली असल्याची चर्चा सुरू आहे. वाहनचालक हे लाखणगाव, जारकरवाडी, कवठे, शिरूर परिसरातील असल्याने खंडणी व माल लुटून नेणाऱ्या समाजकंटकांना ओळखत नसल्याने वाहनमालकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असल्याने मचंर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी खंडणी वसुल करणाऱ्या कांद्याच्या गोणी व भुईमूगाची पोती लुटून नेणाऱ्या लुटारूंचा शोध घेऊन जास्तीत जास्त कडक कारवाई करून खंडणी वसुल करणाऱ्या आहे.तरकारी माल, कांद्याच्या ट्रक, कोंबड्यांच्या गाड्या अडवून खंडणी मागणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कारवाई केली जाईल. संबंधितांची नावे मंचर पोलीस ठाण्यात द्यावी, त्यानुसार कारवाई केली जाईल. - रवींद्र मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे
संपकाळात घेतली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2017 12:55 AM