मुंबई - उद्धव ठाकरेंना आरोप करायचे असतील तर लोकांसमोर जावं, जाहीर भाषण करून करावे. संजय राऊतांना मुलाखत द्यायची असेल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपाशी जो दगाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात मग २०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला ते दिसलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं वचन दिलं सांगता पण स्वत:चा सार्थ साधत दिलेला शब्द पाळला नाही. सध्या उद्धव ठाकरे नैराश्य झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठे आणि उद्धव कुठे असाही खोचक टीका दानवेंनी केली.
तसेच पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजपा चालत नाही. बिहारमध्ये भाजपाची संख्या जास्त असतानाही आम्ही मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना दिले. तेच धोरण महाराष्ट्रात राबवलं. आम्ही कुठला निर्णय घ्यावा हे आम्हाला सांगू नये. तुम्ही दोघं कोण हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुलाखत फडणवीस-राज आणि शिंदेंची या सगळ्यांची घ्यावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंना विचारावी असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
तसेच मला चिंता आहे ती मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे असंही ते म्हणाले. त्याचसोबत शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केले, ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवे म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. शिवसेनेचे राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केले. पण त्यांचे राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरले असा आरोप ठाकरेंनी भाजपावर केला.