भोकरदन ( जालना ) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रावसाहेब दानवे यांनी संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, ते 6 जानेवारी रोजी रात्री मुंबई येथून रेल्वेने जालना येथे आले व तेथून भोकरदन येथे आले. मात्र प्रकृती चांगली नसल्याने त्यांनी दुपारी कोरोना चाचणी केली. 7 रोजी रात्री 12 वाजता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. याचबरोबर, रावसाहेब दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. स्वत: ला आयसोलेशन करुन घेतले असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यातील बड्या नेत्यांना कोरोना संसर्ग (होण्याची मालिका सुरुच आहे. राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचे समोर आले आहे. तसेच, महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
साहेब लवकर बरे व्हा - सदाभाऊ खोतकोरोनाची लागण झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी ट्विट करुन माहिती दिल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साहेब, लवकर बरे व्हा, असे म्हटले आहे. "साहेब, कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बरे व्हा! राज्यातील जनतेचा आशिर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी आहे", असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.