- अल्पेश करकरे
मुंबई : राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी तिन्ही पक्षाकडून सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं आश्वस्त करण्यात येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे मोहरे फोडून दाखवा असं विरोधी पक्षाला आव्हान केलं होतं . ते आव्हान केंद्रीय मंत्री व भाजप वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी स्वीकारले असल्याचे चर्चा आहे.कारण रावसाहेब दानवे यांनी महा विकास आघाडीचे 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा एक गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलंय.
उद्धव ठाकरेंनी विरोधकांना काय आव्हान दिले होते ?
सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं, ते पिलू वळवळ करत होतं, आता फुत्कारत आहे, असं म्हणत भाजपला उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता.महाराष्ट्र सरकार पडणार नाही. आपले १७० आमदार आपल्याला कधीही सोडून जाणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 3 मार्च रोजी मुंबईत बोलताना व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. परंतु माझे १७० मोहरे तुम्ही फोडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी विरोधकांना केलं होतं. तसेच ते तुमची गुमालगिरी करणार नाहीत, असं ही त्यांनी म्हटलं होतं. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आव्हान केलं होतं.
रावसाहेब दानवे यांनी काय गौप्यस्फोट केला ?
भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. "महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील", असं धक्कादायक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी 25 आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. "जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत", असं म्हणत दानवेंनी त्या आमदरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला.
कोण नाराज चाचपणी सुरू ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान , भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी स्वीकारत, खरच त्यांच्या वक्तव्यानुसार आमदार फोडले तर नाही ना.... त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षश्रेष्ठी आपल्या आमदारांची फोन करून विचारपूस करत असल्याची चर्चा आहे.रावसाहेब दानवे यांचा हा दावा खरा की खोटा, पण त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची चिंता वाढली आहे. सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे का ?, याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
भाजपच्या दाव्यामुळे सरकार धास्तावले
यापूर्वीही अनेकदा भाजप नेत्यांकडून सरकार पडणार अशी अनेक वक्तव्य आपण वारंवार ऐकली आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सरकारला अनेक मुद्द्यांवर विरोधक कोंडीत पकडताना दिसत आहेत . त्यामुळे सरकार कुठेतरी अनेक मुद्यांवरून डगमगलेले असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार विविध मुद्द्यांवरून आपल्याच सरकारवर नाराज असल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी केलेल्या गौप्यस्फोटयामुळे सरकार धास्तावल्या असल्याचे देखील चर्चा आहे.
दानवे यांचा खरच गौप्यस्फोट की फक्त चर्चा ?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमीच काही ना काही विषयांवरून चर्चेत असतात. त्यामध्ये नुकतच त्यांनी जे वक्तव्य केलेला आहे त्यावरून राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र दुसरीकडे दानवे यांनी खरच गौप्यस्फोट केलाय कि फक्त चर्चा घडवण्यासाठी वक्तव्य केले असल्याची देखील चर्चा सुरू आहे. कारण अधिवेशन सुरू आहे, तसेच दुसरीकडे तीन दिवस होळी आणि सुट्ट्यांचा काळ आहे, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी तर हे विधान केलं नाही ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.त्यामुळे दानवे यांनी जो गौप्यस्फोट केलाय तो खरा की खोटा हे पुढील काळातच स्पष्ट होईल.