लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेल्या अपशब्दांचा निषेध करण्याकरिता शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात दानवेंची गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढण्यात आली. शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी रात्री भाऊसाहेब चौधरी यांच्या तोंडाला काळे फासले.दानवेंनी आपल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची खिल्ली उडवली असून शिवसेना ते कदापि सहन करणार नाही. शिवसेना राज्यातील गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभी असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. ‘निम का पत्ता कडवा है....’ अशा घोषणांसह ‘दानवे हाय हाय, दानवेंचा निषेध असो’, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी मानपाडा रोड दणाणून सोडला. दरम्यान, कल्याणमध्येही शिवसैनिकांनी दानवेंचा निषेध करत भाजपा सरकारवर सडकून टीका केली. महिला शिवसैनिकांनी दानवेंच्या तसबिरीला जोडे मारले, तर अन्य पदाधिकाऱ्यांनी चपलांचा हार घातला. या वेळी उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला संघटक कविता गावंड, तात्या माने, आरती मोकल, वैशाली दरेकर, केडीएमटीचे सभापती संजय पावशे, प्रकाश तेलगोटे, मधुमती शिसोदे, विवेक खामकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपाने केली ‘सामना’ची होळी : डोंबिवली : राज्य सरकारमध्ये सत्तेत असतानाही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राची कल्याण-डोंबिवलीत जिल्हा भाजपातर्फे गुरुवारी होळी करण्यात आली. नेतिवली येथील टाटा पॉवर कंपनीच्या चौकात भाजपाने हा निषेध व्यक्त केला. शिवसेना भाजपाबरोबर केंद्र आणि राज्य सरकारबरोबर सत्तेत आहे. शिवसेनेकडे मंत्रीपदे असतानाही हा पक्ष कायम आमच्यावर विरोधी पक्षासारखी टीका करत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ‘सामना’ची होळी केल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी दिली. दरम्यान, या वेळी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक महेश पाटील उपस्थित होते.
अंबरनाथमध्ये दानवेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नअंबरनाथ येथे शिवसेनेने शिवाजी चौकात दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्पूर्वीच पुतळा ताब्यात घेतला. शिवसैनिकांनी अगोदर निदर्शने केली. त्यानंतर, दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र, पोलिसांनी लागलीच तो ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांना रोखले.