ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि, 11 - एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे वादग्रस्त आणि शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंविरोधात हल्लाबोल चढवला आहे. दानवेंचे वक्तव्य राज्यातील तमाम शेतक-यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारे आहे. याविरोधात आम्ही राज्यभर निषेध करू, दानवेंना राज्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
राज्यातल्या 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही, शेतमालाला भाव नाही. उलट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासारखे नेते बेजबाबदार, अवमानजनक वक्तव्ये करुन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत, अशी टीका सर्व स्तरातून सुरू आहे.
दानवे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ नसतानाही दुष्काळाचं खोटं चित्र उभं करुन शेतकऱ्यांना मदत दिल्याचं बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं होतं. वास्तविक पाहता राज्य दुष्काळाने होरपळत होता, हे दानवे यांना दिसले नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव विरोधकांनी द्यावा, असं विधानही दानवे यांनी केलं आहे.
निवडणूक काळात ‘लक्ष्मीदर्शन’ घेण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं होतं. शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लावण्याचं काम दानवे यांनी केले असून त्यांना आता राज्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा मुंडे यांनी दिला.
शेतकऱ्यांना कुठलीही मदत करायची नाही, उलट शेतकऱ्यांच्या उत्पन्नांवर कर आकारणी करण्याचा इशारा द्यायचा. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँका तोट्यात जातील, अर्थव्यवस्था धोक्यात येईल, अशी वक्तव्ये करुन शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, हे खेदजनक असल्याचेही श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.
राज्याचे मंत्री विनोद तावडे यांनीही शेतकऱ्यांना फुकटची टोलमाफी हवी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य यापूर्वीही केलं असल्याकडेही मुंडे यांनी लक्ष वेधले.