ऑनलाइन लोकमतवाघोली, दि. २१ : सबमिशनच्या बहाण्याने विद्यार्थिनीला रूममध्ये बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करून धमकी देणे व त्याचप्रमाणे अतिप्रसंग झाल्यामुळे मदत करण्याचा बहाणा करून पुन्हा अतिप्रसंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थिनीला मेसेज करणाऱ्या आणखी एकावर देखील गुन्हा करून तिघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. करण श्रीकांत घुगे, महेश दत्तात्रय कोरडे, अविनाश विजयकुमार शेळके (सर्व रा. वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. याप्रकरणी 19 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी वाघोली येथील एका नामांकित महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिची मोठी बहीणही याच महाविद्यालयामध्ये तृतीय वर्षाला शिकत आहे. पिडीत मुलगी, मोठी बहीण व अन्य तीन मुलींसह वाघोलीमध्ये एका सदनिकेत राहण्यास आहे. ही मुलगी मुळची रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. ती गुरुवारी आॅनलाईन परीक्षेचा पेपर संपवून घरी जात असताना करण घुगे याने तिला माझे सबमिशन चालू आहे फाईल लावायला मदत करण्यास सांगितले. तिने मी तुला ओळखत नाही मी कशी मदत करणार असे विचारले. त्यावर त्याने मदत करण्याची विनंती केल्यावर पिडीत मुलीने त्याला फाईल खालीच घेऊन येण्यास सांगितले. आरोपी करण फाईल आणण्यसाठी रूम मध्ये गेल्यानंतर खिडकीमधून आवाज देऊन फाईल सापडत नसल्याचचे सांगत तिलाही रूममध्ये बोलावून घेतले.
खोलीच्या बाहेर थांबलेल्या मुलीला त्याने जबरदस्तीने आतमध्ये ओढून घेत बलात्कार केला. अत्याचार झाल्यावर खोलीवर आलेल्या मुलीला त्याच दिवशी वेगवेगळ्या नंबर वरून फोन यायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी महेश कोरडे याने तिला फोन करून तुझ्याबरोबर झालेल्या प्रसंगाची माहिती मला आहे, आपण बोलू असे सांगितले. ती त्याला भेटायला गेली. हे दोघे महाविद्यालयामध्ये भेटल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्याने प्रसंग घडलेली खोली दाखवण्यास सांगितल्यावर दोघेही पुन्हा हॉटेलवर गेले. त्या खोलीच्या शेजारील एका खोलीमध्ये तिला बसवत सहानुभुती दाखवण्यास सुरुवात केली. दाराची कडी लावून तिच्यावर बलात्कार केला. तेथून पुन्हा घरी आलेल्या मुलीने भीतीपोटी कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. त्यानंतर तिला फोन व मेसेज येऊ लागले होते.
शनिवारी दुपारी परीक्षेचा पेपर संपवून घरी गेली असता बहिणीने तिच्याकडे अस्वस्थ का आहेस अशी विचारणा केली. त्यावेळी सर्व प्रकार पिडीत मुलीने कथन केला. तिच्या बहीणीने मित्रांना आणिकॉलेज प्रशासनाला याची माहिती दिली. तिच्या मित्रांनी परिसरात दोघांचा शोध घेऊन करण घुगे, महेश कोरडे आणि मेसेज करणारा अविनाश शेळके यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे अश्लिल मेसेज करणाऱ्या आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे.आरोपींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाऊन तास वाघोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसल्याने आरोपींना घेऊन आलेले एक अधिकारी आणि सात कर्मचारी आरोग्य केंद्रासमोर बसून होते. पोलिसांना वैद्यकीय अधिकारी दाद देत नसल्याचा पाढढा यावेळी पोलिसांनी वाचला. आरोपींना घेऊन आल्यावर याठिकाणी वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसल्याचे समजले. पोलिसांनी वैद्यकीय अधिका-यांशी संपर्क साधून तपासणी करायची असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिका-यांनी थोड्याच वेळात तपासणीसाठी येत असल्याचे कळविले. सुमारे पाऊन तासानंतर सातच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर तपासणी करण्यात आली.कॉलेज प्रशासन उदासीन?विद्यार्थिनी सोबत झालेल्या प्रकाराबाबत कॉलेजच्या शिक्षकांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी पालक आणि पोलिसांना कळविण्याशिवाय काहीही केले नाही. त्या विद्यार्थिनीला दवाखान्यात देखील नेले नाही. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनीला कॉलेजमधून कोणतीही मदत केली नसल्याचे विद्यार्थिनीच्या नातेवाईक आणि मित्रांनी सांगितले. याबाबत शुक्रवारी सकाळी कॉलेज प्रशासनाला नातेवाईकांनी जाब विचारल्यानंतर दोघांनाही कॉलेजमधून बडतर्फ करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.