मीरा रोड : इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे शाळेबाहेरूनच अपहरण करून तिच्यावर आठवडाभर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीस उत्तन सागरी पोलिसांनी डहाणू येथून अटक केली. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पीडित मुलीचे वडील पाणीटँकरवर कामाला आहेत. त्यामुळे त्यांची टँकरचालक सोमनाथ शनवार (२२, रा. डहाणू) याच्याशी ओळख होती. २२ फेब्रुवारीला सोमनाथने त्यांच्या मुलीला शाळेच्या बाहेर गाठले. तिला ठार मारण्याची धमकी देत विरारफाटा परिसरात काका शंकर शनवार याच्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, त्याने तिला वापीला नेले. दरम्यान, या प्रकरणी पालकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी २९ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक जगदीश बांगर व हवालदार येले यांनी सोमनाथला १ मार्चला डहाणूतील मसूरपाडा भागात अटक केली व मुलीची सुटका केली. सोमनाथने अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले. पुढील तपास सहायक निरीक्षक प्रियतमा मुठे करीत आहेत. सोमनाथ विवाहित असून त्याची पत्नी गरोदर आहे.
विद्यार्थिनीचे अपहरण करून बलात्कार
By admin | Published: March 06, 2016 1:50 AM