औरंगाबाद : लष्करी महिला अधिकाऱ्याचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार आणि लुटमार करणाऱ्या चार दरोडेखोरांना मकोकाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यातील दरोडेखोरांच्या म्होरक्यावर गंभीर स्वरूपाचे विविध १७ गुन्हे दाखल आहेत.पुणे येथे लष्करात उच्चपदावर कार्यरत असलेली ही ४३ वर्षीय महिला १० एप्रिल २०१० रोजी तिचा पती, १६ वर्षीय मुलगा तसेच त्यांचा वॉचमन आणि त्याची पत्नी यांच्यासमवेत परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ११ एप्रिल रोजी मांजरसुंबा घाटातील ढाब्यावर जेवण झाल्यानंतर महिला अधिकारी व त्यांचे कुटुंब कारने पुण्याच्या दिशेने निघाले. तेव्हा दीपक जावळे (२२), अभय पोरे (२३), विजय बडे (२५) आणि सुनील एखंडे (२४) (सर्व रा. नगर जिल्हा) या दरोडेखोरांनी भाड्याच्या गाडीतून पाठलाग करून चिंचोडी फाट्याजवळ त्यांची कार अडविली.दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व अन्य ऐवज लुटल्यानंतर महिला अधिकाऱ्याला कारमध्ये ओढून नेले. धावत्या कारमध्ये दीपक जावळे आणि अभय पोरे या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर महिलेस विवस्त्र अवस्थेत धावत्या कारमधून ढकलून दिले.नगर-बीड पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करून दुसऱ्याच दिवशी दरोडेखोरांना ताब्यात घेतले. मकोका न्यायालयाने दीपक आणि अभय यांना सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरवून प्रत्येकी जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजुरी; लुटमार प्रकरणी चौघांनाही जन्मठेप, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, अपहरण केल्याच्या आरोपाखाली चौघांना ५ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी एक हजार रुपये दंड, न भरल्यास ६ महिने कैद; मकोका कलम ३,१ प्रमाणे ७ वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५ लाख रुपये दंड, मकोका कलम ३ व २ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
लष्करी महिलेवर बलात्कार; चौघांना जन्मठेप
By admin | Published: August 23, 2016 5:39 AM