पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अनिल पवारसोबत ३ लोकांना सहआरोपी केले आहे. हे तिघे सावज शोधायचे आणि तिथून या इमारतीत आणले जायचे. या प्रकरणी ४ आरोपी झालेत, एट्रोसिटी आणि पॉक्सो दाखल झालाय. आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. वेळ पडली तर आरपीएफच्या ऑफिसमध्ये घुसायला मागे पुढे राहणार नाही असा इशारा देत मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत.
मनसे नेते वसंत मोरे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घ्या, १६ वर्षीय मुलीवर एका दोघांनी बलात्कार केला. बाहेरून येऊन पुणे शहराच्या नावाला काळीमा फासेल त्यांना अशीच जागा दाखवणार. मनसे खपवून घेणार नाही. काल आम्ही आयुक्तांना भेटायला गेलो तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अजूनही आरोपी सापडत नाही. आरोपीला ट्रेस करू शकत नाही. तुम्ही त्याला पळायला संधी देताय. एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊन आरपीएफ आयुक्तांना माहिती नाही. गेल्या ६-७ वर्षापासून इमारत त्या जवानाच्या संस्थेच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखा असं त्यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
छत्तीसगडवरून १६ वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून पुण्यात आले, पुणे रेल्वे स्टेशनवर आल्यावर त्यांना तिथल्या सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीत आणलं गेले. ही संस्था आरपीएफ जवान अनिल पवार याच्या बायकोच्या नावावर आहे. संस्थेचे रजिस्ट्रेशन पुसदमधलं आहे. रेल्वेची इमारत आहे, तिथे काही वर्षापूर्वी रेल्वे कर्मचारी राहायचे. मात्र आता ही इमारत रेल्वेने सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी यांना दिली. त्याठिकाणी रेल्वे स्टेशन अथवा रेल्वेत जी लोकं बेपत्ता होतात, ज्यांची घरे सापडत नाही, मानसिक आजारी असतात अशांना या इमारतीत ठेवले जाते. याठिकाणी लहान मुलांना ठेवता येत नाही. या लोकांच्या घरांचे पत्ते शोधून त्यांना घरी पाठवायचे हे काम सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी करायची. त्याबदल्यात रेल्वेकडून या संस्थेला पैसे मिळायचे.
पण १२ ऑक्टोबरला ही छत्तीसगडची मुलगी या इमारतीत आली. १२ ते १७ तारखेपर्यंत या छोट्या बहिणीवर इथं या आरपीएफ जवानाने ५ दिवस बलात्कार केला. या जवानाची संपूर्ण फॅमिली अंबरनाथला राहायला आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये काम करणारा हा ५२ वर्षाचा नराधम रात्री १ वाजता इथं इमारतीत येऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायचा. १६ वर्षाच्या पोरीवर ५ दिवस बलात्कार करतो, इतके दिवस झाले तरी आजही आरोपी फरार आहे. या प्रकरणी आयुक्तांना भेटलो तरी आरोपी भेटतील असं सांगता, तुमच्या आमच्या आया बहिणींवर अत्याचार झाला असता तर काय केले असते, २०० महिलांच्या एन्ट्री इथं सापडलेत सगळ्यांच्या चौकशी झाली पाहिजे. आरपीएफ जवानाच्या नावावर काळीमा फासली. याठिकाणी प्रत्येक खोलीच्या काचा आज आम्ही फोडल्या. छत्रपतींच्या महाराष्ट्रात असा प्रकार घडतो ते खपवून घेणार नाही. आरपीएफ जवान सापडला पाहिजे. येणाऱ्या २ दिवसांत आरोपी सापडला नाही तर इथून पुढे जे काही घडेल त्याला आरपीएफ पोलीस जबाबदार असतील असं वसंत मोरे यांनी म्हटलं.