ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि.20 - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर मुंबई येथे नेऊन बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी मंगळवेढा येथील एका युवकासह व अन्य एकाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित मुलीने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी किरण किशन चव्हाण (वय १९,रा. शिक्षक कॉलनीसमोर)व त्याचा मित्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी ही एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या मामाच्या घरी (सोलापूर) आली होती. याचदरम्यान पीडित मुलीची व किरण या दोघांची ओळख झाली. पीडित मुलीला सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून आरोपी हा नेहमीच फोनवर बोलायचा. मागील दोन महिन्यांखाली पीडित मुलीला औरंगाबाद येथील एका मुलाने लग्नासाठी पसंत केले होते, या दोघांचा साखरपुडाही झाला होता. याबाबतची माहिती पीडित मुलीने आरोपीस सांगितली होती. तरीही आरोपी किरण याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तू माझ्यासोबत चल, नाही आलीतर मी तुला पळवून घेऊन जाईन असे म्हणत होता.आरोपीने पीडित मुलीस मोबाईलवर एसएमएस पाठवून तू कविता नगर पोलीस लाईनच्या गेटवर ये नाहीतर तुझ्या मामाच्या घरी घुसून तुला ओढून नेईन असे म्हटले.यावेळी पीडित मुलीने घाबरुन त्याला समजून सांगण्यासाठी कविता नगर पोलीस लाईन गेटवर गेली. यावेळी किरण चव्हाण हा अन्य दोन मित्रांसोबत एका कारमध्ये जबरदस्तीने बसवून मंगळवेढा येथे घेऊन गेला. यावेळी सदर गाडी तेथेच सोडून पीडित मुलीला खासगी बसमध्ये बसवून पुण्याला घेऊन गेला. पुण्यात कोणीच ओळखीचे नसल्याने आरोपीने मुंबईतील बहिणीच्या घरी नेऊन पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.चार वर्षांपूर्वी आईचे निधन पीडित मुलीच्या आईचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. वडील सांभाळ करत नसल्याने पीडित मुलगी ही मावशीकडे सोलापुरात राहत असे. तिचे मामा ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत.
शासकीय रुग्णालयात उपचारपीडित मुलीवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक काझी, पोलीस निरीक्षक जिरगे, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, सहायक पोलीस निरीक्षक आयलाने यांनी भेट देऊन पीडित मुलीची विचारपूस केली.
आरोपीस अटकपीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी आरोपी किरण किशन चव्हाण यास सोलापुरातून अटक केली आहे. आरोपीचे वडील हे कृषी खात्यात नोकरीला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले.