प्रशांत शेडगे,
पनवेल-मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जनावरे त्याचबरोबर पादचारी येवू नये म्हणून बाजूला तारेचे कुंपण घातले आहे. त्याच्यावर गंज चढलेला असताना रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात टोल जमा होत असताना कुंपणाची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुणे-मुंबई ही शहरेअगदी जवळ आली आहेत. दररोज अनेकजण पुणे-मुंबईला ये-जा करतात. अशातच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीच्या समस्येसह अपघातही वाढले. दोन्ही शहरांमधील प्रवास वेळखाऊ होऊ लागला. या सर्व समस्या सुटाव्यात, अपघात कमी व्हावेत यासाठी मोठ्या अपेक्षेने द्रुतगती महामार्ग बांधण्यात आला. एकूण १०० कि.मी. लांबीच्या या महामार्गावरून ताशी ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. मात्र ही वेगमर्यादा ओलांडली जात असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होतात. टायर फुटणे, वाहनचालकाचा ताबा सुटणे, दरीत वाहन कोसळणे, वळणाला अपघात होणे, अचानक गाडीला आग लागणे अशा घटना वारंवार घडतात. या अपघातांना आळा बसावा याकरिता गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र महामार्गाच्या दोनही बाजूला तारेचे कुंपण घालण्यात आले होते. वेगवान वाहनांना अडथळा निर्माण होवू नये याकरिता ही उपाययोजना करण्यात आली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महामार्गाच्या बाजूला गावे असल्याने येथे आजही शेती केली जाते. त्यामुळे शेतकरी जनावरे पाळतात. ही जनावरे महामार्गावर येवू नयेत याकरिता रस्ते विकास महामंडळाने तारेचे कुंपण घातले होते. जेव्हा कुंपण घातले तेव्हापासून त्याची देखभाल करण्यात आली नाही त्यामुळे कित्येक ठिकाणी तारा गंजल्या आहेत. तर काही जागेवर त्या तुटल्या असल्याने तेथून महामार्गावर सहज प्रवेश करता येतो. या व्यतिरिक्त जिथे तारेचे कुंपण टाकणे शक्य नाही तिथे संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. परंतु ही भिंत सुध्दा बऱ्याच ठिकाणी कोसळली आहे. यामुळे जनावरांना आतमध्ये प्रवेश करता येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महत्वाची बाब अशी की पनवेल, खालापूर पट्ट्यात आता नागरीकरणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच गावातील शेती बिगर शेती झाली आहे. शेती नसल्याने जनावरे मोकाट सोडून देण्यात आले आहेत. त्यांना गोठा किंवा वेसन नसल्याने तो मोकाट फिरतात, अशी जनावरे सुध्दा महामार्गावर येवून अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती महामार्गाची रुंदी वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याबरोबर इतर उपाययोजना करण्याची भाषा बोलली जात असताना साधे गंजलेले कुंपण बदली करता येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मोकळी जागा असल्याने ग्रामस्थही महामार्गावर प्रवेश करीत असल्याचे या ठिकाणी काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात कार्यकारी अभियंता संजय गागुर्डे यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.