मुंबई : गृह विभागाकडून पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी उपायुक्त व साहाय्यक आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू असताना आता चार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.मुंबई पश्चिम विभागाचे प्रभाकर भालेराव यांची लातूरला बदली झाली आहे. तेथील दुर्गापा पवार यांची नागपूर (शहर), तर तेथे कार्यरत असलेल्या सर्जेराव शेळके यांची औरंगाबाद कार्यालयात बदली करण्यात आलेली आहे. औरंगाबादेतील गोविंद सैदाने यांना मुंबई (मध्य) कार्यालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असल्या तरी त्यामागे प्रशासकीय कारण नमूद करण्यात आले आहे. पाच अधिकाऱ्यांना बढतीचार आरटीओंबरोबरच उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशानुसार ५ अधिकाऱ्यांना उप प्रादेशिक अधिकारी गट-अ मध्ये बढती देण्यात आलेली आहे. एस. डी भोर (औरंगाबाद-लातूर), व्ही. एल. काठोळे (अमरावती-अमरावती) ए. एस. गायकवाड (अमरावती-वाशिम), ए. जी. पवार (औरंगाबाद-हिंगोली), आर. एम. बेलसरे (नागपूर-नागपूर ग्रामीण) अशी त्यांची नावे असून, ११ महिन्यासाठी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर पुुढील निर्णय न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)
आरटीओ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
By admin | Published: August 27, 2015 2:38 AM