मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले असून, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने केली. माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात रिपाइं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आप्पा कातकडे यांनी दिला आहे. बुधवारी दुपारी घाटकोपर येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. कातकडे म्हणाले की, ‘उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मंजुळे यांचा रिपाइं आदर करते. मात्र आठवले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मंजुळे यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला जाईल. मराठा समाजाला शिक्षण, नोकरी यामध्ये आरक्षण मिळावे, ही रिपाइंचीही भूमिका आहे. शिवाय मराठा क्रांती मोर्चाला दलित विरुद्ध मराठा असा रंग देण्यास रिपाइंचा ठाम विरोध आहे. त्यामुळे मंजुळे यांनी वादावर पडदा टाकला नाही, तर रिपाइंला त्यांच्याविरोधात तीव्र भूमिका घ्यावी लागेल.’दरम्यान, रिपाइंतर्फे घाटकोपर पश्चिमेकडील सर्वोदय सिग्नलजवळ बुधवारी दुपारी १ वाजता मंजुळे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये, अशी मागणीही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
नागराज मंजुळेंविरोधात रिपाइं आक्रमक
By admin | Published: September 21, 2016 5:44 AM