ठाणे : ठाणे शहर पोलिसांनी राबविलेल्या एका विशेष मोहिमेत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ने सुमारे ३० लाख रुपयांचे दुर्मीळ मांडूळ तर युनिट ५ने दोन लाखांच्या हस्तिदंताची विक्र ी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ आणि हस्तिदंत हस्तगत केले असून, तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पारसिक रेतीबंदर येथे दुर्मीळ मांडूळ प्रजातीच्या वन्यजीवाची विक्र ी करण्यासाठी दोघे जण येणार असल्याची माहिती युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने २८ आॅगस्ट रोजी रेतीबंदर भागात सापळा लावून विकास वायकर (२९) आणि उमेश आदिमुनी (२०) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ३९ इंच लांबीचे, ७४० ग्रॅम वजनाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे ३० लाखांची किंमत असलेले मांडूळ प्रजातीचे दुर्मीळ वन्यजीव जप्त केले. या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. युनिट ५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी वर्तकनगर पोखरण रोड क्रमांक १, उपवन येथील रेडबुल हॉटेलमध्ये छापा टाकून हस्तिदंताची विक्री करण्यासाठी आलेल्या ब्रिजेशकुमार सिंग याला २५ आॅगस्ट रोजी अटक केली. त्याच्याकडून हस्तिदंत जप्त केले आहे. वनरक्षक संदीप मोरे यांनी हा मूळ हस्तिदंत असल्याची पडताळणी केल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त भारत शेळके, मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
दुर्मीळ मांडूळ, हस्तिदंत जप्त
By admin | Published: September 07, 2016 5:27 AM