फोंडा : मोले येथे रविवारी रात्री वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दुर्मीळ ‘वनमानव’ प्राणी आढळला. स्थानिकांनी वनखात्याला माहिती दिल्यानंतर त्यांनी या प्राण्याला ताब्यात घेतले आणि सोमवारी संध्याकाळी त्याला महावीर अभयारण्यात सोडण्यात आले, अशी माहिती राउंड फॉरेस्ट आॅफिसर राजेश नाईक यांनी दिली.वनमानव या प्राण्याबाबत समाजात अनेक गैरसमज असून, त्याच्या नजरेतून प्रकाश परावर्तित होतो, त्याच्या मांसात औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्याला मोठी किंमत मिळते, असा अपप्रचारही केला जात असल्याचे नाईक यांनी सांगितले. वनमानव प्राणी निशाचर असून दाट जंगल भागात आढळतो. किडे, मुंग्या हे त्याचे खाद्य आहे. त्याची नजर तीक्ष्ण असल्यामुळे त्याच्या डोळ्यांवर प्रकाशझोत पडल्यास तो त्याच वेगात परावर्तित होतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत. रेंज फॉरेस्ट आॅफिसर डी. एम. कुडाळकर यांनी या प्राण्याबाबत माहिती देताना सांगितले की, हा प्राणी १५ ते २५ सेंटीमीटर लांब असतो. त्याचे वजन साधारणपणे २७५ ते ३४८ ग्रॅम असते. त्याची चिकित्सा केल्यानंतर त्यास जंगलात सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
गोव्यात आढळला दुर्मीळ ‘वनमानव’ प्राणी
By admin | Published: April 21, 2015 1:09 AM