भोर : पर्यटनात वाढ व्हावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रायरेश्वर किल्ल्यावर पर्यटनपूरक सोयी-सुविधांसाठी सुमारे १ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भविष्यात अजून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.भोर तालुक्यात छत्रपती शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला तसेच रोहिडेश्वर या गडकोट किल्ल्याच्या पायथ्याला, शौचालय युनिट, टेंट बांधणे, म्युझियम, रेलिंग, रायरेश्वर मंदिर परिसर सुधारणा, पार्किंग सुविधा कामांसाठी रायरेश्वर किल्ल्याला १ कोटी ६४ लाख ६५ हजार व रोहिडा किल्ल्याला सुमारे १ कोटी ३१ लाख ८० हजार असा एकूण २ कोटी ९६ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १ कोटी वर्ग करण्यात आले असून त्याचा भूमिपूजन समारंभ रावल यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार वर्षा शिंगण, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, लहू शेलार, विठ्ठल आवाळे, शैलेश सोनवणे, रोहन बाठे, राजेश काळ, धनंजय वाडकर, नितीन धारणे, दिलीप बाठे, हभप नामदेवमहाराज किंद्रे, साळवे, चंद्रशेखर शेळके, सुनील धुमाळ, विश्वास ननावरे, श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव, सुभाष कोंढाळकर, नारायण जंगम, पोपट सुके, सुनील भेलके, सोमनाथ जंगम, तानाजी जंगम, सखाराम जंगम, किशोर जंगम, गोपाळ जंगम, कृष्णा जंगम, गोविंद जंगम उपस्थित होते.प्रास्ताविकात रणजित शिवतरे यांनी पर्यटन विभागाने प्रथम रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली.आमदार संग्राम थोपटे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ले विकासापासून वंचित होते. त्याला निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात पर्यटनात वाढ होणार आहे. मात्र रस्ता करताना वनविभागाची जमीन जाणार असल्याने त्याला मंजुरी घेऊनच काम करावे लागणार आहे.’’या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून भोर, वेल्हे तालुक्यातील गडकिल्ले विकासापासून दूर असल्याने पर्यटन बंद होते. मात्र या किल्ल्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करून पर्यटनपूरक उद्योग सुरू केल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.’’दुसऱ्यांदा हेलिकॉप्टर गडावर१९९२ मध्ये शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री असताना रायरेश्वर किल्ल्यावर हेलिकॉप्टरने आले होते. त्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल व खासदार सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने गडावर आले होते. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. रायरेश्वर व रोहिडेश्वर या किल्ल्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची अनेक वर्र्षांपासूनची मागणी होती. मात्र प्रत्यक्षात पर्यटन विभागाकडून पाहणी करून विकास आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळाली. निधीही वर्ग झाल्याने दोन्ही गडांचा पर्यटनपूरक विकास होणार आहे. त्यामुळे ४०० वर्षे किल्ल्यावर राहून अनेक असुविधांमुळे जीवन कंठत होते.मात्र आता काही तरी आशेचा किरण दिसत असल्याने गडावरील जंगम लोकांत आनंदाचे वातावरण आहे. यामुळे पर्यटकांत वाढ होणार असल्याने रोजगारही मिळणार असल्याचे किशोर जंगम यांनी सांगितले.
रायरेश्वरचा पर्यटनदृष्ट्या होणार विकास
By admin | Published: May 05, 2017 1:50 AM