भोसरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या घोषणेला पाच महिने उलटून गेले, तरी अद्याप राष्ट्रीय व सहकारी बँका पूर्वपदावर आल्या नसल्याचेच चित्र बहुतांश बँकांमध्ये दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून भोसरी परिसरात एटीएममध्ये पुन्हा खडखडाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी अडचण झाली आहे. चलनतुटवडा निर्माण झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांना एटीएममध्ये वारंवार फेऱ्या मारूनही कॅश मिळत नाही, तर बहुतांश सहकारी बँकांची एटीएम बंदच आहेत. भोसरी परिसरात सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएम, तसेच शाखा आहेत; पण अनेक बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी बँका सुरू असतात मात्र एटीएममध्ये पैसे नसतात. बहुतांशी बँकांमध्ये फक्त आपल्याच बँकेचे एटीएम वापरण्याची मनमानी सुरू आहे.आळंदी रस्त्यावरील स्टेट बँकेत शुक्रवारी दिवसभर इंटरनेट नसल्यामुळे पैसे काढणे व ट्रान्स्फर करणे बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे एटीएमबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. असा तांत्रिक बिघाड कायमच होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे खातेदारांची अडचण होत असून, खासगी मनिट्रान्सफर दुकांनातून आर्थिक भुर्दंड सहन करून पैसे पाठवणे जिकिरीचे ठरत आहे. (वार्ताहर)१०० व ५०० च्या नोटांचा तुटवडा सर्वच बँकांमध्ये १०० व ५००च्या नोटांचा तुटवडा सध्या जाणवत असून, २००० रुपयांच्या पटीत पैसे काढण्याबाबत सूचना बँक अधिकारी देत आहेत. बँकांमध्येच नोटांची कमतरता असल्याने एटीएममध्ये कोठून येणार? त्यामुळे बहुतांश एटीएममध्ये २००० च्या पटीतच नोटा काढाव्या लागत आहेत. १०० किंवा ५०० च्या पटीतील नोटा काढण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा पैसे मिळाल्याचा मेसेज येतो, पण पैसे येत नाहीत. त्यासाठी पुन्हा बँकेत जाऊन कागदोपत्री दिव्य पार पडणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. एटीएममध्ये पैसे ठेवण्यास टाळाटाळ भोसरी परिसरात एमआयडीसीतील कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बँकेत पगार जमा झाले, की कामगार तत्काळ ते काढून घेत असून, कॅश जवळ बाळगणे योग्य समजत आहेत. कारण एटीएममधून वेळेवर पैसे मिळाले नाहीत, तर अडचण नको असे कामगारांचे मत आहे. सर्वच बँकांनी एटीएम सुविधा पूर्ववत केली, तर पैसे खात्यात ठेवणे योग्य राहील असे नागरिकांनी या वेळी सांगितले. ‘कॅशलेस’ची लाट मंदावलीनोटबंदीच्या निर्णयामागे असलेला कॅशलेस व्यवहारांचा उद्देश अयशस्वी होत असलेला दिसून येत आहे. नोटबंदीनंतर महिनाभर चलन तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक कॅशलेस व्यवहारांकडे वळले होते. पण आता पाच महिन्यांनंतर जवळपास सर्वत्रच कॅश देऊन व्यवहार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल पंप, हॉस्पिटलची मोठी बिले, तसेच मॉल्समधील खरेदी अशा मोठ्या व्यवहारांसाठी क्रेडिट-डेबिट कार्डांचा वापर करून कॅशलेस व्यवहार केला जात असला, तरीही रोजच्या आयुष्यातील इतर विविध खर्च कॅश पद्धतीनेच करण्यावर ग्राहक व विक्रेत्यांचा भर दिसतो.>चिंचवडमध्ये चलन तुटवड्यामुळे ग्राहकांची पायपीट चिंचवड : नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएम केंद्राबाहेर लागणाऱ्या रांगांचे चित्र सध्या दिसत नाही. मात्र निर्बंध उठविल्यानंतर एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. उन्हातान्हात वणवण फिरूनही पैसे मिळत नसल्याने अनेकजण संतप्त झाले आहेत. नोटाबंदी होऊन पाच महिने उलटले, तरीही नोटांचा तुटवडा संपला नसल्याचे वास्तव चिंचवड परिसरात दिसत आहे. एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याने अडचणी येत आहेत. ज्या दिवशी बँकेला सुटी असेल, त्या दिवशी अनेक जण एटीएम केंद्राबाहेर रांग लावत आहेत. मात्र पैसे संपल्यानंतर त्यांची धावपळ होत आहे. पैसे शिल्लक नसल्याचे फलक लावले जात नसल्याने प्रत्येक जण पैसे काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. चार ते पाच एटीएम फिरल्यानंतर एखाद्या ठिकाणी पैसे मिळत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.कित्येक एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नसल्याने पैसे केव्हा येणार याची माहिती मिळत नाही.ज्या मशिनमध्ये पैसे आहेत तेथे रांगा लागत आहेत. मात्र पैशांचा अपुरा पुरवठा होत असल्याने अडचणी येत आहेत. एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिक बँकेत गर्दी करीत आहेत.अनेक बँकांमध्ये रांगा लागत असल्याचे दिसत आहे. कॅशलेस व्यवहारासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, ठरावीक ठिकाणे वगळता अन्य ठिकाणी कॅशलेस व्यवहार होत नसल्याचे दिसत आहे. नोटबंदी असताना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बँकेच्या अनेक योजना सर्वसामान्य नागरिक वापरत होते. मोबाइलच्या माध्यमातूनही छोटे-मोठे व्यवहार सुरू होते. मात्र आता या योजनांमध्ये बदल होत असल्याने याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत असल्याने कॅशलेस व्यवहाराची सुविधा छोट्या-छोट्या व्यवहारांत वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. (वार्ताहर) >एटीएम तरी चालू राहू द्या : बोपखेलवासीयांची मागणीबोपखेल : गणेशनगर भागात एकूण तीन एटीएम आहेत; परंतु या एटीएममध्ये कधी तरीच पैसे असतात. त्यामुळे नागरिकांची नाहक गैरसोय होत आहे. बोपखेल गावात एकही बँक उपलब्ध नाही फक्त एटीएम आहेत. मात्र, या एटीएममध्ये पैशांचा भरणा वेळेवर केला जात नाही. त्यामुळे जर एखाद्या नागरिकाला ऐन वेळेला पैशांची गरज लागली, तर मोठी धावपळ करावी लागते. नागरिकांना आपले पैसे काढण्यासाठी विश्रांतवाडी किंवा भोसरीला जाण्याशिवाय पर्याय नसतो. बोपखेल गावात अनेक छोटे मोठे व्यावसायिक आहेत. व्यावसायिकांना जर अचानक एखाद्या कामगाराला पैसे द्यायचे असले तर त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर जावे लागते.जर या एटीएम मशीनमध्ये वेळेवर पैशांचा भरणा केला तर नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यावर्ती बोपखेल गाव असूनही येथे नागरिकांना प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. बोपखेल भागात एकूण लोकसंख्या पंधरा ते वीस हजार एवढी असूनही येथे बँक नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आपले व्यवहार दापोडी, विश्रांतवाडी सारख्या ठिकाणी जाऊन करावे लागतात. त्यामुळे एटीएम केंद्रातून तरी वेळेवर पैसे मिळावेत, अशी येथील नागरिकांची आशा आहे. बोपखेलमध्ये एकही बँक नसल्याने एटीएम हा एकच पर्याय पैसे काढण्यासाठी आहे; परंतु बोपखेल, गणेशनगरमधील तीनही एटीएममध्ये कधी कधीच पैसे असतात. त्यामुळे जर एखाद्या कामगाराला अचानक पैशांची गरज पडली तर पाच ते सहा किलोमीटर जाण्याशिवाय पर्याय नसतो असे बोपखेल येथील व्यवसायिक निखिल घुले यांनी सांगितले.सांगवीत खडखडाटसांगवी : सांगवी परिसरात वेगवेगळ्या बँकांची सुमारे ४० एटीएम असून, सध्या शासकीय सुट्या, मार्च एंडिंग, बँकांमधील नोटांचा तुटवडा यांमुळे या सर्वच एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळत आहे. साई चौक, काटेपुरम चौक, जुनी सांगवीतील शितोळे चौक परिसरातील एटीएम केंद्र केवळ शोभेसाठी आहेत की काय, असा सवाल विचारला जात आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे रोख पैसे जवळ नसल्याने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. निकिता जाधवर म्हणाल्या, ‘‘कार्ड असतानाही एटीएमच्या समस्येमुळे रोख पैसे बाळगणे भाग पडत असून, आता बँकेतून जास्त पैसे काढून स्वत:जवळ ठेवावे लागत आहेत.’’>पिंपळे गुरव परिसरात सर्रास एटीएम केंद्र बंदपिंपळे गुरव : सांगवी, दापोडी व पिंपळे गुरव परिसरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरात विविध बँकेची एटीएम केंद्र आहेत. मात्र, बहुतांश एटीएम केंद्र बंद तर काही एटीएम केंद्रात पैसे नसल्याने पैशासाठी धावपळ करावी लागत आहे. नोटाबंदीमुळे सुट्या पैशांची चणचण भासत आहे. अनेक दुकानदार कॅशलेश व्यवहार करताना दोनशे रुपयांपेक्षा अधिक रुपये असतील तरच व्यवहार केले जातात. नागरिक मोठ्या कॅशलेश व्यवहाराला पसंती देऊ लागले आहेत. दुकानदार छोट्या व्यवहाराला पसंती देत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील ‘एटीएम’मध्ये खडखडाट
By admin | Published: April 08, 2017 2:05 AM