पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळाली आहे. त्यामुळे महापौर कोण होणार याबाबतची चर्चा रंगली आहे. महापौरपद चिंचवड, भोसरी की पिंपरी मतदार संघातील उमेदवाराला मिळणार यावरुन खासदार व आमदार समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. नवीन महापौरांची निवड येत्या १३ तारखेस होणार आहे. दुस-या बाजुला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत चर्चा रंगली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. यापूर्वी महापौरपद हे अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असल्याने त्यावर महापौर शकुंतला धराडे यांना संधी मिळाली. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ओबीसी सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. त्यामुळे महापौर कोण होणार, ही चर्चा रंगू लागली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाला ७७ जागा मिळाल्याने महापौर भाजपाचाच होणार हे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, भाजपात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीन मतदारसंघातील नेत्यांचे तीन गट आहेत. महापालिका निवडणुकीतील उमेदवारीपासून गटबाजी प्रकर्षाने दिसून आली आहे. त्यामुळे पिंपरीची जबाबदारी असणारे खासदार अमर साबळे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यापैकी कोणाच्या समर्थकास संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. जुन्या नगरसेवकास संधी देणार, की नवीन चेहऱ्यास संधी देणार याबाबतही चर्चा रंगली आहे. महापौरपदासाठी जगताप गटाचे शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम, आमदार लांडगे गटाचे नितीन काळजे, संतोष लोंढे, सागर गवळी, केशव घोळवे यांच्या नावाची चर्चा आहे. पिंपरीतील संदीप वाघेरे यांच्या नावाची चर्चा आहे. महापौरपदाची माळ आपल्याच पदरात पडावी, यासाठी इच्छुकांनी शहरातील नेत्यांची मनधरणी व मोर्चे बांधणी सुरू केली आहे.(प्रतिनिधी)विरोधी पक्षनेत्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दीमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. सत्तांतर झाल्याने भाजपा हा शहरात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता हे पद राष्ट्रवादीकडे असणार आहे. या पदासाठी माजी महापौर मंगला कदम, माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, दत्ता साने यांच्या नावाची चर्चा आहे.
खासदार, आमदारांमध्ये रस्सीखेच
By admin | Published: February 28, 2017 1:53 AM