पुणे, दि. 24- गणेशोत्सवाच्या काळामध्ये महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आलं असून महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोणत्याही महिलेची त्रासाला सामोरं जावं लागू नये ही पोलिसांसह संपुर्ण पुणेकरांची जबाबदारी आहे. असं पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या आहेत. तसंच ‘लोकमत’ने सुरु केलेला ‘ती'चा गणपती उपक्रमाचंही त्यांनी कौतुक केलं आहे. महिला सक्षमीकरणाचं पुरोगामी पाऊल असल्याचं मत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केलं.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी पुणेकरांना गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचं आणि आपल्या माता-भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन केलं. महिलांची काळजी घेतली तरच गणेशोत्सव ख-या अर्थाने शांततेत पार पडेल. ‘लोकमत’ ने महिलांसाठी गणेशोत्सवा निमित्त खास उपक्रमाचं आयोजन केलं आहे. या उत्सवाला ‘ती’ चा गणपती असं नाव देण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व महिलांचा सहभाग असतो, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. महिलांना सन्मान द्या. वेळप्रसंगी त्यांच्या रक्षणासाठी उभे राहा. जर महिलांना कोणी त्रास देत असल्याचे निदर्शनास आले तर आपण स्वत: पुढाकार घेऊन पोलिसांना संपर्क साधावा, असं पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी म्हंटलं आहे.
महिलांनी पोलिसांच्या बडी कॉप, पोलीस काका आणि सिटी सेफ या अॅपचा वापर करुन आपली तक्रार न घाबरता नोंदवावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. यासोबतच सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.