मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असा दावा विरोधकांकडून करण्यात आला त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कडाडले असून त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, रश्मी ठाकरे - पंतप्रधान मोदींची भेट झाली असेल तर पीएमओ कार्यालयाने खुलासा करावा. केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुसरे काही काम नाही. ते अस्वस्थ झालेत. ते भाजपाचे, मोदींचे गुलाम बनलेत. अशाप्रकारे भेट झाली असं ते म्हणत असतील तर PMO कडून खुलासा करा, या तारखेला भेट झाली वैगेरे. आम्ही कुणाला भेटलो नाही. भेटणार नाही असं राऊतांनी स्पष्ट केले.
त्याचसोबत दीपक केसरकरांच्या दंडात ताकद नाही. सावंतवाडीच्या मोतीतलावावरचा डोम कावळा आहे. लोक हाडहाड करतात. हा डोम कावळा आमची ताकद दाखवतो, हिंमत असेल तर निवडणुकीत उभे राहा आणि सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवा असं आव्हानही राऊतांनी दिले आहे.
दरम्यान, संपूर्ण १० वर्षाचा हिशोब पंतप्रधान, गृहमंत्री यांना द्यावा लागणार आहे. किती काळा पैसा सरकार पाडण्यासाठी दिला? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी, आमदार-खासदार खरेदीसाठी दिला? हा हिशोब घेऊन या, आम्हीही चर्चेला तयार आहोत. महाराष्ट्रात येऊन मनोरंजन करू नका. लोक टाळ्या वाजवत नाहीत तर इन्जॉय करतात. तुम्हाला २०२४ च्या निवडणुकीत कळेल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
मोदी-शाह जनतेचे मनोरंजन करायला येतात कधी मोदी येतात, कधी शाह येतात हे राज्यातील जनतेचे मनोरंजन करतात. ३७० कलम आपण काढलं, त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला. शाहांनी स्मरणशक्ती व्यवस्थित करावी. ३७० हटवून काय दिवे लावले हे सांगा. आजही हजारो काश्मीर पंडित निर्वासित आहे. त्यांचा आक्रोश तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आजही २-४ लष्करी जवान शहीद होतायेत. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकबाबत लोकांना खोटे बोलला, लाज तुम्हाला वाटली पाहिजे. आजही काश्मिरी मुले अस्वस्थ आहेत. अखंड हिंदुस्तान करू अशी घोषणा केली काय झाले, पुलवामा घडवले गेले, शहिदांचा बाजार मांडला त्यामुळे लाज तुम्हाला वाटली पाहिजे असं राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
छत्रपती संभाजीनगरची जागा खऱ्या शिवसेनेची
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सोबत घेतलं त्याबद्दल अमित शाहांचे आभार आहे. आम्ही एकच टोला मारू. छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेची आहे. ती खरी शिवसेना लढत आहोत आणि जिंकणारही. अमित शाह यांनी निर्माण केलेल्या टोळीकडून ती जागा भाजपाने घेतली तर त्यांना लाज वाटायला हवी. शिंदे टोळीच्या जागा ते घेतायेत. आमच्या नाही. आमच्या परंपरेच्या ज्या जागा आहेत त्या आम्ही लढतोय आणि जिंकूनही दाखवू असं संजय राऊतांनी म्हटलं.
कोल्हापूरची जागा आम्ही लढवू, काँग्रेसला ठणकावलं
सांगलीत साडे तीन लाखांनी काँग्रेसचा पराभव झाला. २०१९ ला सांगलीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. तो मतदारसंघ काँग्रेसचा राहिलेला नाही. पण कोल्हापूर सातत्याने ३० वर्ष शिवसेना लढतेय. विद्यमान जागा ही आमची आहे. अभिनेते रमेश देव हेसुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरात लढले आहेत. ती जागा आमची आहे असं राऊतांनी काँग्रेसला ठणकावलं.
प्रकाश आंबेडकर भाजपाला मदत करणार नाहीत असा विश्वास
आम्ही शब्द पाळणारे लोक, काही लोक अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतात. यूपीत मायावती आहेत. तसं महाराष्ट्रातही अनेकांच्या बाबतीत हे बोलले जाते. आरएसएसचा छुपा अजेंडा घेऊन काम करणारे आहेत. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे सदस्य आहेत. आज वरिष्ठ नेते बसून वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करू असं त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांवर आमचा प्रामाणिक विश्वास आहे. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातल्या मातीतले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांच्याकडून भाजपाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत होणार नाही ही आम्हाला खात्री आहे असंही संजय राऊत यांनी सांगितले.