विरोधकांचा आवाज क्षीण : बिगर ऊसउत्पादकांचा करिष्मा; विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभवबारामती : सभासदसंख्या मोठी, कार्यक्षेत्र मोठे, त्याचबरोबर जवळपास साडेसहा हजार बिगर ऊसउत्पादक सभासदांनी ‘सोमेश्वर’प्रमाणेच ‘छत्रपती’ कारखान्याच्या निवडणुकीतदेखील विरोधकांना झटका दिला. या बिगर ऊसउत्पादकांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, यासाठी विरोधक म्हणून पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने आवाज उठवला. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रचारात भर दिला. त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.विरोधकांमुळे कारखान्याची प्रगती थांबली. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण प्रचार यंत्रणा स्वत: राबविली. जाचक व त्यांच्या सहकाऱ्यांनीदेखील नियोजनबद्ध प्रचार केला. परंतु, तालुक्यातील माजी मंत्र्यांनी त्यांच्या कारखान्यात केलेल्या तडजोडीमुळे जाचक यांना आवश्यक रसद मिळाली नाही. त्यामुळे जाचक यांना एकाकी लढत द्यावी लागली. कारखान्यावरील कर्ज, सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याची खुंटलेली प्रगती आदींवर जाचक यांनी प्रचारावर भर दिला. या कारखान्याचे कार्यक्षेत्र इंदापूर व बारामती आहे. त्यामुळे बारामतीच्या मतदारांचा प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलवर राहिला. तसेच, बिगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मागील ५ ते ६ वर्षांपासून जाचक यांनी उचलून धरला होता. त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आघाडी सरकारने जाता जाता बिगर ऊस उत्पादकांच्या मतांचा अधिकार कायम ठेवला. त्याचा झटका सोमेश्वरप्रमाणे छत्रपतीच्या निवडणुकीत दिसून आला आहे. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी आक्रमक प्रचार यंत्रणा राबविली. मात्र, आर्थिकबाबतीत जाचक यांच्या श्री भवानीमाता पॅनल कमी पडल्याचे चित्र दिसून आले. सोमेश्वरच्या निवडणुकीनंतर छत्रपतीची निवडणूक यंत्रणा देखील अजित पवार यांनी स्वत: संभाळली. निवडणुकीतील तडजोडींना महत्त्व देऊन माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला. त्याचबरोबर तालुक्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘कर्मयोगी’ कारखान्याच्या निवडणुकीत हस्तक्षेप होणार नाही, असा अलिखित करारच केला होता काय, असे चित्र दिसून आले. कारण कर्मयोगीची निवडणूक एकतर्फी झाली. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी कर्मयोगीच्या निवडणुकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे विरोधक म्हणून छत्रपतीच्या निवडणुकीत लढत असलेल्या जाचक यांना पाटील यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. याच कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. स्वत: शेवटपर्यंत त्यांनी प्रचार सभांबरोबर मतदारांच्या थेट गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याबरोबर आमदार दत्तात्रय भरणे यांनीदेखील कारखान्याची निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न असल्याने विशेष लक्ष दिले. या कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. त्याचा फायदा उचलण्यात त्यांना यश आले. ‘माळेगाव’चा पराभव जिव्हारी लागलेल्या पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या. त्यानंतर छत्रपतीच्यादेखील सर्व जागा जिंकून या कारखान्याचा गडदेखील मोठ्या मतांच्या फरकाने राखला. सोमेश्वरप्रमाणे छत्रपतीची निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेतली. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे विरोधकांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.४छत्रपतीच्या सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय प्रतीक आहे. वेगवेगळ्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन आरोप केले. मात्र, ‘छत्रपती’चा सभासद हा कोणाचे ऐकणारा नाही. सभासदांनी दाखविलेल्या या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. ४आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. याचा फायदा झाला. कारखान्याचा विस्तारवाढ, डिस्टिलरी उभारण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.४कारखान्यावरील कर्ज, सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याची खुंटलेली प्रगती आदींवर जाचक यांनी प्रचारावर भर दिला. या कारखान्याचे कार्यक्षेत्र इंदापूर व बारामती आहे.