ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 1 - सध्या कोणाचाही कोणाला फोन येऊ शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या, त्यानंतरच काय ते ठरविता येईल़. परंतु विनाकारण आकांडतांडव केले जात असून यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करीत खडसे हे चांगले व्यक्ती असल्याची पाठराखणही सपाचे आमदार अबू आझमी यांनी केली़. कंधार येथील एका कार्यक्रमासाठी ते बुधवारी नांदेडात आले होते़ ते म्हणाले, मी भाजपाच्या विरोधात आहे. परंतु खडसेंचे जळगांवमध्ये चांगले काम आहे. अल्पसंख्याक समाजातील लोकही त्यांना मानतात. त्यामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नजरेत आले आहेत. आजघडीला त्यांच्या पाठीशी भाजपाचा कुणीही उभा राहत नसून खडसेंनीही राजीनामा देण्याची गरज नसल्याचे आझमी म्हणाले. या देशात मुस्लिमांना काहीच द्यायचे नाही हाच भाजपाचा अजेंडा आहे. त्यामुळे भाजपाच्या काळात आम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. देशात शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था महाराष्ट्रात असून भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्येत वाढच झाली आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात कोणतेच काम योग्यरितीने झाले नाही़. विदेश नितीही चुकीची असून चीन चिथावणीखोर वक्तव्य करीत आहे, तर मोदी पाकिस्तानात जाऊन शरीफ यांची भेट घेत आहेत. सरकार आपल्या भूमिकांवरही ठाम नसून महाराष्ट्रात गोमांस बंदी केली असताना शेजारील त्यांचीच सत्ता असलेल्या गोव्यात मात्र गोमांसावर बंदी नाही़, अशी दुटप्पी भूमिका या सरकारची आहे. मुस्लिमांसाठी असलेल्या बजेटमध्येही वाढ करण्याची गरज असून आरक्षणाच्या मुद्यावर आता काँग्रेस ओरडत असली तरी, त्यांच्या सत्ता काळात त्यांनी अखेरच्या क्षणी केवळ अध्यादेश काढण्यापेक्षा दुसरे काही केले नाही़.