मुंबई : राज्याचे मंत्रिपद मिळवलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) राज्यात मोठे भगदाड पडले आहे. वैचारिक मतभेद आणि जानकर वेळ देत नसल्याचे कारण देत, रासपमधील एका नगरसेविकेसह १५ जिल्हाध्यक्ष आणि पाच हजार कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाला राम राम करत, संबंधित पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत, ‘प्रजा सुराज्य पक्ष’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.रासपच्या स्थापनेपासून गेली १३ वर्षे पक्षासोबत काम करणाऱ्या दशरथ राऊत यांनी केंद्रीय सचिव पदावरून पायउतार होत, नव्या पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, जानकर यांच्याकडे मंत्रिपद असूनही पक्ष विस्ताराकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्ते आणि नागरिकांच्या कामांना दिरंगाई होत आहे. याउलट पक्षामध्ये बेशिस्तीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे त्रस्त प्रदेश स्तरापासून ते तालुका स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चार विभागीय अध्यक्षांसोबत १५ जिल्हाध्यक्ष आणि अहमदनगरमधील राहाता नगरपरिषदेच्या नगरसेविका शारदा गिधाड यांनी राजीनामा दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत युतीसोबत महत्त्वाची भूमिका पार पडल्यानंतर, जानकर यांच्या गळ््यात मंत्रिपदाची माळ पडली होती. मात्र, मंत्रिपदाची हवा लागल्यानंतर, नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी उमेदवारांना पक्षाचा झेंडाही पुरवण्यात आला नसल्याचा आरोप प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे, शिवाय अशा अनेक कारणांमुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, पक्षाध्यक्षांकडून सापत्न वागणूक मिळत असल्यानेच नवा पक्ष सुरू केल्याचा गंभीर आरोप संबंधित पदाधिकाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)
‘रासप’ला राज्यात भगदाड!
By admin | Published: January 06, 2017 4:24 AM