ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 7 - राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीचा दर जाहीर करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील जमिनीला किमान 40 लाख ते 85 लाख एकरी भाव मिळणार आहे. विशेष म्हणजे आदिवासी शेतक-यांना बागायतीसाठी दीडपट दर देण्यात येणार आहे. तत्पूर्वी राज्याच्या गतिमान विकासासाठी होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता. आता या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. आजवर राज्यात कोणत्याही प्रकल्पाला दिला गेला नाही, एवढा आर्थिक मोबदला भूसंपादनासाठी देण्यात आला आहे.पूर्व-पश्चिम अशा या महामार्गाला राज्य वा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी दक्षिण-उत्तर छेद देतात त्या ठिकाणी टाऊनशिप उभारण्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने भर दिला आहे. या महामार्गामध्ये 24 नवनगरांची (टाऊनशिप) उभारणी करण्यात येणार असून, त्यातील 15 जागा आता निश्चित करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृषी समृद्धी केंद्रे असतील. त्यांच्या उभारणीमुळे कृषी माल काही तासांत मुंबईच्या बंदरात आणि त्यानंतर जगाच्या बाजारपेठेत पोहोचू शकेल. या 15 टाऊनशिपसंदर्भातील अधिसूचना नगरविकास विभागाचे उपसचिव संजय सावजी यांनी काढली होती. तसेच नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.या टाऊनशिपमध्ये लँडपुलिंग फॉर्म्युलाने किंवा खासगी सहभागानेही उभारणी करता येईल. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील बीड नाकझरी, बोरी, खानापूर (अंशत: क्षेत्र), मानकापूर, नागाझरी, रामपूर (अंशत: क्षेत्र) आणि रेनकापूर ही गावे टाऊनशिपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव या गावांचा समावेश असेल.
आणखी वाचा(समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध)(समृद्धी महामार्गाची गरज काय ?)(समृद्धी महामार्गासाठी मुद्रांक शुल्क माफ)