प्राची सोनवणे / नवी मुंबईनोटाबंदीचा फटका बाजार समितीलाही बसलेला दिसत आहे. बाजार समितीमध्ये सध्या मंदीची लाट पसरली असून, भाज्यांच्या दरात प्रतिकिलो सरासरी ५ ते ६ रुपयांची घसरण झाली आहे. बाजार समितीत दररोज ५०० ते ५५० ट्रक मालाची आवक होते. गुरुवारी येथे ९३ ट्रक आणि ४९९ टेम्पो भाजीमाल उतरवण्यात आला, त्यापैकी ८० टक्के मालाचीच विक्री झाली. फळ बाजारात ६४ ट्रक आणि १९६ टेम्पो मालाची आवक झाली. नोटाबंदीमुळे आठवडाभरात भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली.जुन्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने बहुतांश व्यापाऱ्यांचा धंदा उधारीवरच सुरू आहे. सामान्यांनी फळे, भाजीपाला खरेदीकडे आखडता हात घेतल्याने दर घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. खरेदी केलेला माल घेण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संजय पानसरे यांनी व्यक्त केली. बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. घाऊक बाजारपेठेतील दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. येत्या काळात हे दर वाढणार नसल्याचा खुलासा करून रिटेल बाजारातील दर मात्र वाढणार असल्याचे पानसरे यांनी सांगितले. जवळ असलेले पैसे, उधारीवर किंवा जुन्या नोटांचा वापर करून शेतमालाची खरेदी केली जात आहे. नवीन चलन उपलब्ध नसल्याने उधारीवर भाजीपाला विकत घेतला जात आहे. विक्रीस येणाऱ्या शेतमालापैकी अर्धाअधिक शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागत आहे.
नोटाबंदीमुळे एपीएमसीत भाजीपाल्याचे दर घसरले
By admin | Published: November 18, 2016 7:20 AM