ऑनलाइन लोकमत
औरंगााबद, दि. 12 - मुंबईत 9 आॅगस्ट रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे,यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आजपासून रथयात्रा काढण्यात आली. टिव्ही. सेंटर येथे सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रथयात्रा कोपर्डीच्या प्रवासाला रवाना झाली.
कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेतील नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यासाठी गतवर्षी ९ आॅगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेत पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यभर मोर्चे निघाले. मात्र आजही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने ९ आॅगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे,यासाठी रथयात्रेच्या माध्यमातून जनजागरण करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेताल. त्यानुसार बुधवारी दुपारी टि.व्ही.सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जयघोषात रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मूधकरअण्णा मुळे, बाळासाहेब थोरात, प्रा. शिवानंद भानुसे, रमेश केरे, प्रा. माणिक शिंदे, सतीश वेताळ, मनोज गायके, श्रीकांत माने, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,जी.के. गाडेकर, किशोर चव्हाण, विशाल पवार, संतोष काळे, गणेश वडकर, भागवत आगलावे, बाळासाहेब भुमे, सुनील बहादुरे, ऋ षिकेश मोरे, पियुष भुंगे आदींची उपस्थिती होती.
अहमदनगर येथे कॅण्डमार्च-
रथयात्रेविषयी समन्वयक रविंद्र काळे, अप्पासाहेब कुढेकर म्हणाले की, ही रथयात्रा आज गंगापूर, नेवासा मार्गे अहमदनगर येथे जाईल. अहमदनगर येथे कोपर्डीच्या घटनेच्या निषेधार्थ आयोजित कॅण्डमार्च मध्ये सहभागी होईल. यांनंतर कोपर्डी येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीला समन्वयक सहभागी होतील. कोपर्डी येथे पीडितेला श्रद्धांजली वाहून पुढील प्रवासाला जाईल.
संपूर्ण राज्यात रथयात्रा-
९ आॅगस्ट रोजी मुंबईत होणा-या मुक मोर्चासाठी खेड्यापाड्यातील जनतेने स्वत:हून सहभागी व्हावे. मुंबईतील मोर्चाचे नियोजन त्यांच्यापर्यंत जावे, यासाठी ही रथयात्रा प्रथम संपूर्ण मराठवाड्यात फिरणार आहे. याशिवाय राज्यातील अन्य जिल्ह्यातही अशाच प्र्रकारची रथयात्रा काढून जनजागृती करण्यासंदर्भात गुरूवारी कोपर्डीत आयोजित बैठकीत निर्णय होईल.