कुडाळ : कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्याजवळ मालदेव गावचे कोयना धरणामुळे पुनर्वसन झाले आहे. मात्र आजही या अख्ख्या गावात शामराव कोकरे यांचे एकच कुटुंब येथे राहात आहे. ओस पडलेलं गाव तर भोवताली अभयारण्य वन्यप्राण्यामध्ये आजही हे कुटुंब येथेच राहून आपला उदरनिर्वाह करीत आहे. या गावची जावळी तालुक्यात शासन दफ्तरी नोंद असल्याने कोकरेंना शिधापत्रिका मिळत नव्हते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तहसीलदार रणजित देसाई यांनी बामणोलीत कॅम्प लावल्यामुळे व त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोकरेंना साठ वर्षांनंतर शिधापत्रिका देण्यात आली. त्यामुळे कोकरे कुटुंबीय भारावून गेले.मालदेव गावाचे पुनर्वसन घेऊनही कोकरेंनी मात्र गाव सोडलेच नाही. ८५ वर्षीय शामराव कोकरे आपल्या पत्नीसमवेत गावात एकटेच राहतात. तर मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. अत्यंत कष्टमय जीवन जगताना किमान शासनाच्या योजनांचा लाभ तरी मिळावा, यासाठी कोकरे मेढ्याला पायी खेटे मारत होते. आजही वासोटाजवळ असलेल्या मालदेव गावातून ते पायी तीन दिवसांचा प्रवास करून मेढ्याला यायचे; मात्र शासनदफ्तरी या गावची नोंदच नसल्यामुळे त्यांना साधी शिधापत्रिकादेखील मिळत नव्हती.बामणोली येथे तहसीलदार देसाई यांनी कॅम्प लावला, त्यावेळी त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. तत्काळ त्यांनी आपल्या विशेष अधिकारातून तहसील कार्यालयाच्या रेकॉर्डरुममधून किमान आवश्यक पुरावे, अवश्यक कागदपत्रे काढून कोकरेंना प्रथम पिवळे शिधापत्रिका दिली. तर इतर नोंदीदेखील सापडल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना जातप्रमाणपत्र मिळण्यास यापुढे कोणतीच अडचणदेखील भासणार नाही. गावावरचे प्रचंड प्रेम आणि मातीशी असणारे मायेचे नाते म्हणून पुर्नवसन झाले असले तरीही कोकरे मायभूमीची सेवा करत राहिले. अजुनही त्यांना शहरीकरणाचा स्पर्श झालेला नाही.महाराजास्व अभियानांतर्गत तहसीलदार देसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे साठ वर्षांनंतर या कोकरे कुटुंबाला शिधापत्रिका मिळाली. (प्रतिनिधी)रेशनचे धान्य पाहून डोळ्यात आले पाणीआजही ग्रामीण, दुर्गम भागात रेशनचे धान्य म्हणजे लोकांना आपल्या कुटुंबाचा आधार वाटतो. कोकरेंना शिधापत्रिका मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात पावशेवाडी येथील दुकानातून दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ मिळाले. हे धान्य पाहून कोकरे यांनी कोयना खोऱ्यातून दोन दिवस चालत येऊन तहसीलदार देसाई यांचे आभारमानले. वासोटा परिसरात असलेला मालदेव गावच्या धरणामुळे पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे येथील व्यवस्थाच रद्द करण्यात आले होती; परंतु केवळ येथील रहिवासी मानून कोकरेंना शिधापत्रिका दिली आहे. यापुढे त्यांचे जातीचे दाखले व इतर प्रश्न मार्गी लागण्यास त्यांना मदत होईल. तशा त्यांच्या जुन्या नोंदीदेखील तहसील रेकॉर्डरुममध्ये आढळल्या आहेत.-रणजित देसाई, तहसीलदार जावळीशिधापत्रिका मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी फार मोठी मदत केली. तर शासनाच्या योजनेत सहभागी होऊन रेशनच्या माध्यमातून जे धान्य मिळत आहे. या धान्याचा मोठा आधार वाटू लागला आहे. - शामराव कोकरे, ग्रामस्थ मालदेव
६० वर्षांनी मिळाली शिधापत्रिका
By admin | Published: November 27, 2015 8:41 PM