मुंबई : तूरडाळीचे भाव गगनाला भिडलेले असताना येत्या आॅगस्ट ते आॅक्टोबर या सणासुदीच्या काळात रेशन दुकानांतून १२० रुपये किलो दराने तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्णयाचा फायदा ७० लाख ७ हजार ५८९ शिधा पत्रिकाधारकांना होणार आहे. तूरडाळीचे वितरण या तीन महिन्यांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्नयोजनेतील २४ लाख ७२ हजार ७५३ आणि बीपीएलमधील ४५ लाख ३४ हजार ८३६ शिधा पत्रिकाधारकांना त्यामुळे १२० रुपये किलोने डाळ मिळेल. राज्य शासन ही डाळ खरेदी करणार असून त्यासाठी ८४ कोटी ७४ लाखांंच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र, यापूर्वी देखील १०० रुपये किलोने तूर डाळ विकण्याची घोषणा केली परंतु १०० रुपये दराने डाळ मिळालीच नाही. आताच्या घोेषणेची तरी अंमलबजावणी होणार का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.वास्तविक, सणासुदीला तूरदाळीचा कोणताच पदार्थ बनविला जात नाही. गोडधोड पदार्थांसाठी हरबरा डाळ लागते. ही डाळही महागली आहे. त्यामुळे तूरदाळ रेशनवर स्वस्तात देऊन सरकारने काय साधले, असा प्रश्न उपस्थित होतो. (प्रतिनिधी)
सणांसाठी रेशनवर मिळेल स्वस्त तूरडाळ
By admin | Published: July 06, 2016 12:53 AM